Sunday, April 22, 2018

Did I Really Quit?


खरंच का हरलेय मी? खरंच का हरलोय आपणं? एका आठ वर्षाच्या कोवळ्या जीवाचा असा अंत पाहिल्यावर वाटत, या देशात सर्व काही हरलंय. माणुसकी हरली, सर्वधर्म समभाव हरला, विसरलो आपणं ती देशाप्रती असणारी प्रतिज्ञा, हरलो आपणं आपला भारतीय असल्याचा स्वाभिमान.
आठ वर्षांची आसिफा, नुसती जिवंत असतानाच बलात्कार होऊन नाही मेली, तर मेल्यावरही तिचा बलात्कार होत राहिला. एक जण म्हणाला "अच्छा हुआ आसिफा मर गयी, बड़ी होती तो वैसेभी आतंकवादी बनती." हा अत्याचार झाला तिच्यावर, कुणी तिच्या गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं हा एक अत्याचार, एकाने तर वरकडीच केली, म्हणे "तरुणांकडून अशा चुका होतंच राहतात." परत परत अत्याचार होत राहिले तिच्यावर. अरे त्या मेलेल्या जीवाला तरी शांती लाभू द्या ना! कदाचित ती सुद्धा वरून म्हणत असेल, मेलेय मी आता, थांबवा माझ्यावर होणारे हे रोजचे बलात्कार. माणुसकी नसलेले पशु झालाय हा समाज. तिच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, भलती- सलती विधाने करणारे आपले नेते, जेव्हा त्यांच्या मुली-बहिणीवर असे अत्याचार होतील तेव्हा गप्प बसतील का? तेव्हा त्यांच्यातला माणूस जागा होईल. पण आता का त्यांच्यातली माणुसकी झोपलीय कारण ती तुमची कोणी नाही म्हणून?
अरे नसेल तिचा आणि आपला धर्म एक, पण माणुसकी तर सर्वांसाठी एकच असते ना? आणि आपल्या सर्वाना बांधून ठेवणारा सगळ्यात मोठा धर्म आहे आपण "भारतीय" आहोत तो. हिंदू-मुस्लिम, शीख-ख्रिश्चन, यांच्यापेक्षा हा धर्म कितीतरी मोठा आहे. बाजार मांडला गेलाय तिच्या भावनांचा. तिच्या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल हे पाहण्यापेक्षा काही काही नेते आपली विधान मांडण्यात आणि त्यांचं समर्थन करण्यात गुंतलेत. आपण भलेही आज तिच्यासाठी Candle Light मोर्चे काढतो. #justiceForAsifa लिहतो. Tweets करतो, Facebook वर Comments पण करतो. पण यापेक्षाही जास्त तिला गरज आहे ती न्यायाची. आणि त्यासाठी योग्य ते कायदे बदलले गेले पाहिजेत. सगळ्याच बाबतीत दया-क्षमा-शांती, हे धोरण योग्य नाही ठरत. जिथे गरज पडते तिथे जशास तसे उत्तर पण द्यावे लागते. जसे कायदे आज सौदी अरेबिया मध्ये आहेत ना बलात्काऱ्यांबाबतीत तसेच इथे पण लागू केले पाहिजेत. भर चौकात, सगळ्यांसमोर फाशी द्या अशा लोकांना. पुन्हा असली कृत्य करताना दहा वेळा विचार केला पाहिजे त्यांनी. जसा एका मुलीचा बलात्कार होतो तसेच या लोकांचे पण चार चौघात धिंडवडे निघाले पाहिजेत. खरंच असा कायदा यायला हवा आपल्या देशात.
दुःख मला पण झालं आसिफा तुझ्यासाठी, अश्रू मी हि गाळले. भलेही आपली जात-धर्म एक नसेल पण आहोत तर भारतमातेच्याच मुली ना आपण. स्वप्नात तुझ्या किंचाळ्या-रडणं सगळं काही येऊन गेलं नि मनाचा थरकाप उडाला अगदी. माझ्या चिमुकल्या बहिणीवर इतके अत्याचार करू तरी कसे वाटले त्या हैवानांना? हो हैवानच म्हणावे लागेल त्यांना. पूर्वीच्या काळी लोकांना त्रास द्यायला वाईट शक्ती जशा असुरांचे, दानवांचे रूप घेऊन यायच्या तसे हे आजच्या युगातील दानव आहेत. कधी कधी भीती सुद्धा वाटते हाच का तो भारत देश जिथे परस्त्री मातेसमान मानली जाते? मग या चिमुकलीची दया का नाही आली त्यांच्यापैकी कुणालाच? आताशी भीती वाटते एकटी बाहेर पडायला, न जाणो कधी कुणाच्या वासनेला बळी पडू आम्ही मुली.
खूप सारे प्रश्न आहेत ग पण कुठेतरी विश्वास पण आहे, कि हे चित्र बदलेल, आम्ही बदलू, कुठूनतरी सुरवात करायचीच आहे ना मग आम्ही आमच्यापासूनच करू ती सुरवात. या देशाची तरुण पिढी करेल ते. आज सर्व देश एकत्र आलाय तुला न्याय मिळवून देण्यासाठी. तेव्हा नक्की वाटत या लोकांचे Candle Light मोर्चे, #justiceForAsifa. Tweets, Facebook Comments वाया नाही जाणार. प्रत्येकाचे तुला न्याय मिळवून देण्याचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश्य एकचं आहे. जेव्हा आम्ही तुझ्या न्यायासाठी एकत्र आलो ना तेव्हा किती हिंदू आलेत, किती मुस्लिम आलेत, किती ख्रिश्चन आलेत हे नाही मोजलं कोणी, त्याची गरजच पडली नाही. कारण तेव्हा माणुसकी एकत्र आली होती. अजूनही मेलेली नाही आहेत हि मन.
माझ्यासारखी एक मुलगी आज जर हा विचार करतेय कि माझ्या पासून दूरच्या राज्यात राहत असलेल्या माझ्या एका बहिणीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी तर असले विचार तुला आज अनेकजणांमध्ये सापडतील. आहोत तर शेवटी आपण भारतमातेची मुलं ना?
जेव्हा जेव्हा इथे अत्याचार झालाय, तेव्हा या अत्याचाराला थांबवण्यासाठी कोणी ना कोणी शक्ती जन्माला आलीय. कधी ती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तलवारीनं अन्यायाची चिरफाड करायला आली, तर कधी भगतसिंग-आझादांचे रूप घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला आली. राक्षसांचा अत्याचार वाढल्यावर प्रत्यक्ष देवी सुद्धा जिथं कालीच रूप घेऊन राक्षसांचा नायनाट करायला प्रकटते, तिथे तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार आम्ही.
तुला न्याय मिळेल नक्की मिळेल. जेव्हा त्या नराधमांना शिक्षा होईल तेव्हा तुझा समाधानी चेहरा नजरेसमोर येईल, जो पाहून आमच्या जीवाची घालमेल नक्की थांबेल, कारण तेव्हा माझ्या या बहिणीला न्याय मिळालेला असेल.

© वृषाली

No comments:

Post a Comment