मध्यंतरी एक चित्रपट पाहण्यात आला माझ्या, जितेंद्र नायक असलेला. ज्यामध्ये तो एक शिल्पकार असतो आणि त्याला जीवनातली सर्वोत्कृष्ट कलाकृती घडवायची असते. तो अगदी दिवस-रात्र एक करतो त्यासाठी. कलाकृती असते एका स्त्री ची. सर्व शिल्प अगदी मनाजोगतं घडवलेलं असत त्यानं, पण त्या स्त्री च्या रिकाम्या हातात असं काय दाखवायचं कि जेणेकरून ते शिल्प जगाला अगदी परिपूर्ण वाटेल, हेच त्याला कळत नसत. कधी तो तिच्या हातात फुल ठेवून पाहतो, कधी वीणा, तर कधी काय पण त्याला ते चित्र पूर्ण वाटतच नाही. त्याचा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, कि एका स्त्री च्या हातात असं काय शोभून दिसेल ज्यामुळे ती परिपूर्ण वाटेल? शेवटी त्याचा प्रश्न सोडवतो एक लहान मुलगा, त्या स्त्री च्या हातात एका लहान बाळाची प्रतिकृती देऊन. तेव्हा त्याला त्याच ते शिल्प पूर्णही वाटत नि जगातली सर्वोत्कृष्ट कलाकृती घडवण्यातही तो यशस्वी झालेला असतो. असाच काहीसा विषय आहे माझा आजचा. तिला काय हवं असत?
"What “She” Wants??"
" ती " . . . . . .
आपल्यातली ती म्हणजे "स्त्री". जी अनेक रूप घेऊन आपल्या आयुष्यात येते. आई, आजी, बहीण, पत्नी, मैत्रीण. पण या सर्वांपेक्षाही तिची एक वेगळी ओळख असते, ते म्हणजे ती एक स्त्री असते. अगदी आपल्याच Generation प्रमाणे बोलायचं झालं तर "ती" म्हणजे एक मुलगी.
काय हवं असत एका मुलीला? मुलीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप मोठा प्रश्न आहे हा. पण इतरांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर अगदी सहज-सोपा, पटकन काहीतरी उत्तर देता येणारा प्रश्न. बऱ्याच वेळा आपण या प्रश्नाची आपल्या परीनं काहीतरी साचेबद्ध उत्तर ठरवलेली असतात, नि दरवेळी हीच तिला सांगण्यात येतात. "ती" House Wife आहे तर हा घे दर महिन्याचा ठराविक पगार, घर-दार, मुलांना सांभाळ. "ती" विद्यार्थिनी आहे तर, अमुक एका चांगल्या शाळेत नाव घातलंय तुझं, आता चांगले मार्क पाडून, अगदी बोर्डात वगैरे येऊन दाखव कारण आम्ही तुझ्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. कधी कधी तर “तिला” हे शिक्षण सुद्धा नशिबी नसते मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असे विचार आजही काही काही ठिकाणी पाहायला मिळतात. "ती" नोकरी करतेय तर हे नोकरी वगैरे लग्न ठरेपर्यंतच ठीक आहे नंतर सासरचे लोक म्हणाले तर सोडावी लागेल हं नोकरी.
बस समाजानं त्याच्या मर्यादा तिच्यासाठी केव्हाच आखून ठेवल्यात. तिला काय हवं याचा विचार क्वचितच कोणीतरी करत. "ती" आई असेल तर तीन घर आणि मुलांना संभाळायला हवं. "ती" मुलगी असेल तर शिक्षण-नोकरी यांची कसरत पार पाडून सुस्थळी पडायला हवं, "ती" बहीण असेल तर तिच्या संरक्षणाची जबादारी भावाने घ्यायला हवी. यादी वाढवली तर खूप मोठी होईल. पण खरंच का हे गरजेचं आहे?
नाही अजिबात नाही. आई हि केवळ house wife नसते. She is a Home Maker. ती फक्त नऊ महिने मुलांना पोटात वाढवत नाही तर, त्यांना शिक्षण, चांगले संस्कार देऊन या जगात पुढे जाण्यासाठी, समाजातल्या वाईट प्रवृतींविरुद्ध लढण्यासाठी तयार करते. नवऱ्याने दिलेल्या पगारात घरखर्च चालवणे, मुलांना हवं नको ते बघणे, घरातल्या इतर लोकांची काळजी घेणे या सर्वांचं Management शिकण्यासाठी ती काय कोणता Special Course नाही लावत. ते ज्ञान तिला उपजतच असत. आणि यावरूनच तिच्या शक्तीची, अस्तित्वाची खरी ओळख आपल्याला पटायला हवी. एका मुलीचं शिकून, नोकरी करून सुस्थळी लग्न करण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? नाही. ती शिकून कल्पना चावला होऊ शकते, प्रतिभा ताई पाटील होऊ शकते, अगदी मदर तेरेसा पण होऊ शकते. आपली संस्कृती निश्चितच तेवढी महान आहे कि अशा स्त्रिया आपण घडवू शकतो. भावाला राखी बांधून तीच रक्षण होणार असेल तर मग तीच अस्तित्व ते काय? तिला हि स्व-संरक्षणाचे धडे मिळूदेत कि! जर ती लक्ष्मी असू शकते तर ती वेळ प्रसंगी दुर्गा- काली पण बनू शकते. स्वतःच संरक्षण स्वतः करू शकते.
हे सर्व करण्यासाठी "तिला" हवं असत "मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य". एका मुलीला जेव्हा मनाप्रमाणे जगता येत ना तेव्हा तीच आयुष्य परिपूर्ण होत. मनाप्रमाणे स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काही करायला मिळालं तर त्या पुढे जाऊन आशा भोसले - मेरी कोम होतील, मनाप्रमाणे स्व-संरक्षणाचे धडे घेतले तर उद्या त्या किरण बेदी - मीरा बोरवणकर बनतील. कोण म्हणत स्त्रिया पुरुषांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात सहज वावरू शकत नाहीत? अरे तिच्यातल्या स्त्रीला फुलू द्या, मनासारखं थोडं तरी जगू द्या. आपली मते तिलाही ठामपणे मांडू द्या, जी स्त्री एका जीवाला जन्म देऊन त्याच योग्य लालन-पालन करून त्याला लहानाचं मोठं करते, तीच स्त्री इंदिरा गांधी बनून पूर्ण देश चालवू शकते हे विसरून कसं चालेल आपल्याला? सांगण्याचं तात्पर्य इतकच कि तिला तिच्या मर्जीनं जगू द्या. नका घालू बंधन तिच्यावर समाजाच्या जुन्या रूढी-प्रथांची. अश्या प्रथा ज्या फक्त पुरुषांना हवं ते करायची मोकळीक देतात नि स्त्रियांना उंबरठ्यापलीकडेही पाऊल टाकू देत नाहीत.
असे गैरसमज नका करून घेऊ कि स्त्री तिच्या स्वातंत्र्याचा गैर वापर करेल. एखाद्या मुलीची ओळख ती काय घालते, किती बिनधास्त वागते, यावरून कधीच ठरत नाही. तिची खरी ओळख तिच्या कर्तृत्वावरून ठरते. वागत असेल ती बिनधास्त, घालत असेल Fashionable कपडे पण तीच स्त्री एका Company ची Boss बनून ती यशस्वीरीत्या चालवून दाखवते तेव्हा तीच कौतुक करायला आपण का नाही पुढे होत? Company साठी तीन दिलेलं योगदान, तिचा वेळ, मेहनत, कष्ट हा एका पुरुषापेक्षा वेगळा का असतो? उलट तीन तर घर सांभाळून हे कर्तव्य पार पाडलेले असत, तीच तर जास्त कौतुक करायला हवं अश्या वेळी आपण. पण नाही आपण लक्षात ठेवतो ते तिचे Dress Code, तीन केलेली Fashion, तीच बिनधास्त वागणं-बोलणं, नि यावरूनच तिला Character Certificate देऊन मोकळे होतो. काय अधिकार आहे आपल्याला असं करण्याचा?
कित्येकदा असे अनुभव मलाही आलेत, अगं वृषाली किती बदललीस तू? इतकी बिनधास्त कशी राहतेस? मान्य आहे मला कि आधी मी खूप वेगळी होते, पण आयुष्यात कधी कधी अश्या घटना देखील घडतात ज्या आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात. मलाही बदललं त्या घटनांनी. पण माझ्या DP आणि Profile Pic वरून तरी तुम्ही मला Judge नाही करू शकत ना? That Fame & Dp Doesn't Define Me. माझे DP आणि Profile Pic हि माझी फक्त बाहेरच्या जगासाठी ओळख आहे, ते माझं Profession आहे. ती actual वृषाली नाही. माझ्या माणसांसाठी असलेली मी आणि बाहेरच्या लोकांसाठी असणारी माझी ओळख यात जमीन आकाशाचं अंतर आहे. मी मुंबईमध्ये आले म्हणजे माझं जग नाही बदललं. माझ्या माणसांसाठी मी पूर्वीसारखीच आहे आणि माझ्यासाठी तुम्हीही तसेच आहात. माझे Friends, माझी माणसं ज्यांना मी सगळं काही Share करू शकते. मला माझ्या Dressing आणि DP वरून judge करण्यात काहीच अर्थ नाही. That Never Define Me. या सर्व गोष्टींना महत्व न देता माझ्याकडे पाहाल तर तुम्हाला नक्कीच जाणवेल कि अरे हि तर आपलीच वृषाली आहे, जशी आधी होती तशीच आजही आहे.
सांगायचं मुद्धा इतकाच कि कधीच “का रे भुललासी वरलिया रंगा” असं होऊ देऊ नका, Specially “तिच्या” बाबतीत. कधी कधी आपणच तिला कमी लेखतो, वेळप्रसंगी स्त्रिया सुद्धा स्त्रियांच्या वैरी होतात. ऑफिस मध्ये कामाशी काम ठेवत जा, कामासाठी जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ, कामाच्या नादात घराकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणजे झालं, बस झालं शिक्षण आता लग्नाचं बघुयात, तू मुलगी आहेस अमुक एका क्षेत्रामध्ये मुलींचं काय काम असत? असं बोलून आपणच तीच मन नकळत दुखवत असतो. तिला पुढे जाण्यास मनाई करत असतो. थोडासा विश्वास तिच्यावर सुद्धा दाखवूयात ना. तुला पुढेच जायचं आहे ना, काम करायचं आहे ना, तू कर आमचा तुला पाठिंबा आहे, इतकंच काय पूर्ण विश्वास आहे तू यशस्वी होशील असं कधी बोलून बघा, तिच्या चेहऱ्यावर त्या वेळी जग जिंकल्याचा आनंद दिसेल तुम्हाला. आपली मानसिकता बदलून, तिच्याशी स्पर्धा न लावता तिला बरोबरीनं वागवा. मग बघा आपला समाज बदलायला वेळ लागणार नाही. तिला तिची ओळख निर्माण करू द्या यामुळे फक्त तिचाच आत्मविश्वास वाढेल असं नाही तर तुमच्याही घराण्याचं नाव उज्वल होईल. मुलगा हा वंशाचा दिवा असला तर मुलगी हि वंशाची प्राणज्योत असते. तिला कधीच कमी लेखू नका.
स्त्री म्हणजे फक्त प्रेम, वासल्य, स्नेह, ममता नाही तर स्त्री म्हणजे शक्ती, मेहनत, जिद्द सर्वकाही आहे. यासाठी "तीला" हवंय "तिच्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य", ते तिला द्या. मग बघा एक नवीन सुरवात होईल आणि ती नक्कीच होईल . . .
© वृषाली
© वृषाली
No comments:
Post a Comment