Showing posts with label कर्ण. Show all posts
Showing posts with label कर्ण. Show all posts

Saturday, January 12, 2019

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, खरं तर हि Post मला सर्वात पहिलीच लिहायची होती, पण कर्णावर लिहायचं म्हटलं तर किती लिहु, आणि काय लिहु समजतच नाही. कर्णावर लिहिण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात मला. पण तरीही प्रयत्न केलाय मृत्युंजय वाचून मला जो कर्ण समजला तो मी तुमच्या समोर मांडतेय, Post जरी मोठी असली तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. काही सूचना असल्या तरी अवश्य कळवा.
मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.
त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.
प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.
आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी.
जास्त दूर कशाला माझीच गोष्ट घ्या ना, खरं तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ग्रुप वर लिहणं इतकंस योग्य नाही. पण तरीही कर्णाच माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे माझं पूर्ण जीवन कर्णमय आहे. पाच वर्षांपूर्वी मी एक अशी मुलगी होते जिने आयुष्यात सर्वकाही गमावलं होत. आत्मविश्वास हरवला होता तर एकीकडे स्व पणाची जाणीव मरून गेली होती. जगणंच विसरून गेले होते मी. पण मृत्युंजय वाचलं नि कर्ण भेटला. गेलेला आत्मविश्वासच नाही तर हरवलेलं आयुष्य सुद्धा परत मिळालं मला. पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला. मला तर एक असा स्रोत मिळाला या पुस्तकांमधून कि ज्यानं मला माझं आयुष्य नव्यानं जगायला शिकवलं. त्या स्रोताचे नाव म्हणजे "कर्ण". शेवटी इतकच सांगावस वाटत,
!! कर्ण काय आहे, एक नाव मनात जपलेलं,
त्याच्या एका नावात, माझं आयुष्य एकवटलेलं,
ज्या मृत्युंजयान जगालाही जिंकलेलं,
राधेयान त्या मला नवीन आयुष्य दिलेलं !!
© वृषाली

Sunday, April 2, 2017

. . . . कर्ण . . . .

                                                           
                     

      कर्णाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. मृत्युंजय वाचताना हे कधीच वाटलं नव्हतं कि हे पुस्तक आपलं सगळ्यात आवडीचं पुस्तक बनेल. आणि कर्ण कायमचा मनात घर करून राहील. त्याच्या दानशूरतेला तोड नव्हती. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, सर्वश्रेष्ठ दानवीर होता, आणि एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती होता. कर्णाबद्दल माहित असलेल्या काही कथांचा संग्रह आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. अर्थात या कथांचा संग्रह मी काही मित्र मैत्रिणी, Google, Facebook इत्यादी माध्यमातून केलाय. तुम्हालाही त्या आवडतील अशी अपेक्षा करते.

१.    एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ  दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला,
हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
   
       अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.आता अर्जुन अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही.
   
        मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की......." या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या". लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की....." या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत". एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....
या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
   
        कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला "अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!" तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!
   
         कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
     
         व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे. शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............⁠⁠⁠⁠





२.      एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ”कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.” या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ”श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.” सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ”ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.”

        पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ”राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.” धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ”काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?” सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.
     
       त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, “एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?” असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ”कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?” त्यावर कर्ण उद्गारला, ” या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?”

     दान देताना सुद्धा त्याने मनात किंचितही कौतुकाची अपेक्षा ठेवली नाही अशा या जेष्ठ दानवीराला माझे कोटी कोटी प्रणाम





                                      कर्णाविषयी प्रकाशित काही पुस्तके जी अवश्य वाचली पाहिजेत

     १. मृत्युंजय  -  शिवाजी सावंत

     २. राधेय  -  रणजीत देसाई

     ३. कौंतेय  -  वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

     ४. धर्मयुद्ध  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ५. श्री कर्णायन  -   गो. नी. दांडेकर

     ६. कर्णपर्व  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ७. कर्ण  -  अनंत पै

     ८. शोध कर्णाचा  -  डॉ. श्रीराम पंडित


© वृषाली