Thursday, July 19, 2018

माझे पुस्तक अनुभव - झोंबी

मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा मी माझा एक छानसा पुस्तक अनुभव घेऊन आलीय. अथक प्रयत्नांची, जिद्दीची अशी हि कादंबरी आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे. आज तुम्हाला मी आनंद यादव यांच्या साहित्य क्षेत्रातील मानाचा "साहित्य अकादमी पुरस्कार" मिळालेल्या झोंबी या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव सांगणार आहे. यातून जे काही मला अनुभवाला आलं, मला शिकायला मिळालं ते तुम्हाला उलगडून सांगतेय तुम्हा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते, तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
झोंबी म्हणजे लढा, युद्ध. पुस्तक वाचल्यावर हे शीर्षक पुस्तकाला किती समर्पक आहे हे लक्षात येत, कारण आनंद यादव यांच हे पुस्तक म्हणजे सुद्धा असाच एक लढा आहे. एक विरुद्ध अनेक असा लढा. मग तो लढा त्यांनी अनेक आघाड्यांविरुद्ध लढला, परिस्थिती, जातीव्यवस्था, गरिबी, वशिलेबाजी, तर कधी स्वतःच्या माणसांविरुद्ध.
खरतर माझ्यासारख्या एका शहरी वातावरणात वाढलेल्या मुलीला हे पुस्तक वाचताना सुरवातीला शंकाच वाटली होती. हे पुस्तक मला नीट समजेल का? कारण अनेकांकडून ऐकलं होत या पुस्तकातील भाषा ग्रामीण आहे, कथेचा बाज ग्रामीण आहे, आणि सगळ्यांशी माझा संबंध कधी आलाच नव्हता. पण जस जस पुस्तक वाचत गेले, तसं तसं या पुस्तकाशी एकरूप होत गेले. आणि यातच लेखकाचं सर्व यश सामावलं गेलंय. हे पुस्तक कोणत्याही थरातील वाचकांना आपलंस करत यात शंका नाही. ग्रामीण-शहरी असा भेद हे पुस्तक वाचताना आड येत नाही कि कुठेही ग्रामीण भाषा समजून घेण्याची अडचण जाणवत नाही. अगदी सहजरित्या समजून जात सर्व काही नि तितक्याच प्रकर्षानं जाणवत लेखकाचं संघर्षमय जीवन.
शिक्षणपूर्तीच ध्येय असलेला लहान मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान वयातच प्रौढ बनून अनंत अडचणींना सामोरं जातो आणि याच अक्षरशः जिवंत वर्णन केलय आनंद यादव यांनी. लेखकाच्या बालमनाचं एकच स्वप्न असत शिकून कोणीतरी मोठं माणूस व्हायचं, घरची गरिबी दूर करायची. पण ते शिक्षण सुद्धा त्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही एकलव्यासारखी स्थिती असते छोट्या आनंदची, स्वतःची विद्या त्याला स्वतःलाच मिळवावी लागते, ते हि घरच्या लोकांनी कितीतरी वेळा परिस्थितीची कारण देत मागितलेली गुरुदक्षिणा देऊन.
त्या काळात असलेली बालविवाहाची प्रथा, वर्णव्यवस्था, गरिबी या सर्वांविरुद्ध लेखकानं दिलेला लढा म्हणजे झोंबी. शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच झाले पाहिजे हा नियम असलेली समाजव्यवस्था, गरीब मुलांच्या शिक्षणाची नसलेली सोय, अगदी फ्रीशिप सुद्धा सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीयांना मिळावी अशी वशिल्याची पद्धत, घरची जबादारी, लहान भावंडांचा सांभाळ, शेतीची काम या सगळ्यातून वेळ मिळाला तर शाळा या सर्वांवर मात करून लेखकानं ज्या जिद्दीनं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं त्या सर्वांचं यथासांग वर्णन पुस्तकात केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरीच का झालं पाहिजे? ज्या गरिबांना फ्रीशिपची जास्त गरज आहे ती त्यांना न मिळता आर्थिक सुस्थितीत असणाऱ्यांना का मिळावी ? गरीब मुलांना केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीत, चांगले कपडेलत्ते नाहीत म्हणून शिक्षणाचा अधिकार का नाकारावा? या सारखे असंख्य प्रश्न छोट्या आनंदच्या मनात रोज उभे राहत नि परिस्थितीमुळे हतबल होऊन मिटून जात.
दोन वेळच अन्न मिळायची मुश्किल असताना त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करतात. आपलं जे वय खेळण्या बागडण्याचं असत तिथे आनंद यादव यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, एकीकडे शेती करून दुसरीकडे शिक्षण पूर्ण केले. घरात वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध पाहून त्यांना मधेच एकदोनदा शाळा सोडावी देखील लागली.
नाईलाजास्तव शिक्षण मधेच थांबल्यावर त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांना झालेलं दुःख यामध्येसुद्धा ते खचले नाहीत. तर झालेल्या दुःखावर मात करण्यासाठी जेव्हा ते आजूबाजूच्या लोकांशी, त्यांच्या परिस्थितीशी आणि पर्यायाने सर्व समाजव्यवस्थेशी जवळ आले तेव्हा जन्माला आला त्यांच्यातला कवी, लेखक, विचारवंत. समाजाच्या ज्या स्तरातून आनंद यादव आले होते, जी समाजरचना, जे लोक, जी कार्यप्रणाली त्यांनी पहिली होती त्या समाजव्यवस्थेचे जिवंत चित्र त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं. अगदी आहे तशाच भाषेत म्हणूनच कदाचीत ते आपल्याला जास्त जिवंत वाटत. जनमाणसात त्याच वेगळेपण उठून दिसत.
अथक प्रयत्न करून आनंद यादव यांनी मॅट्रिक पूर्ण केली, नि त्यांच्या याच लढ्याची कथा म्हणजे झोंबी. हा लढा लढताना त्यांना प्रसंगी आपल्याच माणसांशी सुद्धा बंड करावं लागलं. पण त्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होते. अजाणते वयात झालेल्या त्यांच्या आई बाबांचे लग्न, संसारात मुलाबाळांची भर पडत चाललेली, कर्जबाजारी शेतमळा, भावंडांचे मृत्यू, हे सर्व त्यांनी डोळ्यादेखत पाहिलं होत नव्हे तेच आयुष्य ते जगत आले होते. त्यांना ठाऊक होत जर आज आपण शिकून मोठे झालो तर उद्या आपल्या घरची हि परिस्थिती नक्की बदलेल. म्ह्णून सर्व समाजव्यवस्थेच्या जुन्या, बुरसटलेल्या मतांना छेद देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
या पुस्तकाने आपल्याला एक अशी शिकवण दिलीय, जी आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडेल. ती म्हणजे माणसानं नेहमी ध्येयपूर्तीसाठी जगावं, आपल्या स्वप्नांसाठीं झगडावं.ती पूर्ण करण्याचे मनापासून प्रयत्न करावेत. कारण जितका मोठा संघर्ष तितकेच मोठे त्याचे यश. छोट्या आनंदचा लढा होता शिक्षणासाठी तेच त्याच ध्येय होत. आपल्यापुढे सुद्धा असंच कोणतं ना कोणतं ध्येय नक्की असेल शिक्षण, करिअर, आपलं घर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची स्वप्न वेगळी,ध्येय वेगळी पण करावा लागणारा संघर्ष मात्र सारखाच. कधी तो संघर्ष या समाजाविरुद्ध करावा लागेल, कधी परिस्थितीविरुद्ध तर कधी आपल्याच माणसांविरुद्ध देखील. पण जर आपलं ध्येय योग्य असेल तर मागे वळून न पाहता त्या लढ्यात उतरा. आयुष्याच्या त्या झोंबीसाठी सज्ज रहा.
यातूनच आपल्याला आपला उज्ज्वल भविष्यकाल मिळेल. जो इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देईल.
म्हणतात ना,
"मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची" ...........


© वृषाली

No comments:

Post a Comment