Sunday, April 22, 2018

Did I Really Quit?


खरंच का हरलेय मी? खरंच का हरलोय आपणं? एका आठ वर्षाच्या कोवळ्या जीवाचा असा अंत पाहिल्यावर वाटत, या देशात सर्व काही हरलंय. माणुसकी हरली, सर्वधर्म समभाव हरला, विसरलो आपणं ती देशाप्रती असणारी प्रतिज्ञा, हरलो आपणं आपला भारतीय असल्याचा स्वाभिमान.
आठ वर्षांची आसिफा, नुसती जिवंत असतानाच बलात्कार होऊन नाही मेली, तर मेल्यावरही तिचा बलात्कार होत राहिला. एक जण म्हणाला "अच्छा हुआ आसिफा मर गयी, बड़ी होती तो वैसेभी आतंकवादी बनती." हा अत्याचार झाला तिच्यावर, कुणी तिच्या गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं हा एक अत्याचार, एकाने तर वरकडीच केली, म्हणे "तरुणांकडून अशा चुका होतंच राहतात." परत परत अत्याचार होत राहिले तिच्यावर. अरे त्या मेलेल्या जीवाला तरी शांती लाभू द्या ना! कदाचित ती सुद्धा वरून म्हणत असेल, मेलेय मी आता, थांबवा माझ्यावर होणारे हे रोजचे बलात्कार. माणुसकी नसलेले पशु झालाय हा समाज. तिच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, भलती- सलती विधाने करणारे आपले नेते, जेव्हा त्यांच्या मुली-बहिणीवर असे अत्याचार होतील तेव्हा गप्प बसतील का? तेव्हा त्यांच्यातला माणूस जागा होईल. पण आता का त्यांच्यातली माणुसकी झोपलीय कारण ती तुमची कोणी नाही म्हणून?
अरे नसेल तिचा आणि आपला धर्म एक, पण माणुसकी तर सर्वांसाठी एकच असते ना? आणि आपल्या सर्वाना बांधून ठेवणारा सगळ्यात मोठा धर्म आहे आपण "भारतीय" आहोत तो. हिंदू-मुस्लिम, शीख-ख्रिश्चन, यांच्यापेक्षा हा धर्म कितीतरी मोठा आहे. बाजार मांडला गेलाय तिच्या भावनांचा. तिच्या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल हे पाहण्यापेक्षा काही काही नेते आपली विधान मांडण्यात आणि त्यांचं समर्थन करण्यात गुंतलेत. आपण भलेही आज तिच्यासाठी Candle Light मोर्चे काढतो. #justiceForAsifa लिहतो. Tweets करतो, Facebook वर Comments पण करतो. पण यापेक्षाही जास्त तिला गरज आहे ती न्यायाची. आणि त्यासाठी योग्य ते कायदे बदलले गेले पाहिजेत. सगळ्याच बाबतीत दया-क्षमा-शांती, हे धोरण योग्य नाही ठरत. जिथे गरज पडते तिथे जशास तसे उत्तर पण द्यावे लागते. जसे कायदे आज सौदी अरेबिया मध्ये आहेत ना बलात्काऱ्यांबाबतीत तसेच इथे पण लागू केले पाहिजेत. भर चौकात, सगळ्यांसमोर फाशी द्या अशा लोकांना. पुन्हा असली कृत्य करताना दहा वेळा विचार केला पाहिजे त्यांनी. जसा एका मुलीचा बलात्कार होतो तसेच या लोकांचे पण चार चौघात धिंडवडे निघाले पाहिजेत. खरंच असा कायदा यायला हवा आपल्या देशात.
दुःख मला पण झालं आसिफा तुझ्यासाठी, अश्रू मी हि गाळले. भलेही आपली जात-धर्म एक नसेल पण आहोत तर भारतमातेच्याच मुली ना आपण. स्वप्नात तुझ्या किंचाळ्या-रडणं सगळं काही येऊन गेलं नि मनाचा थरकाप उडाला अगदी. माझ्या चिमुकल्या बहिणीवर इतके अत्याचार करू तरी कसे वाटले त्या हैवानांना? हो हैवानच म्हणावे लागेल त्यांना. पूर्वीच्या काळी लोकांना त्रास द्यायला वाईट शक्ती जशा असुरांचे, दानवांचे रूप घेऊन यायच्या तसे हे आजच्या युगातील दानव आहेत. कधी कधी भीती सुद्धा वाटते हाच का तो भारत देश जिथे परस्त्री मातेसमान मानली जाते? मग या चिमुकलीची दया का नाही आली त्यांच्यापैकी कुणालाच? आताशी भीती वाटते एकटी बाहेर पडायला, न जाणो कधी कुणाच्या वासनेला बळी पडू आम्ही मुली.
खूप सारे प्रश्न आहेत ग पण कुठेतरी विश्वास पण आहे, कि हे चित्र बदलेल, आम्ही बदलू, कुठूनतरी सुरवात करायचीच आहे ना मग आम्ही आमच्यापासूनच करू ती सुरवात. या देशाची तरुण पिढी करेल ते. आज सर्व देश एकत्र आलाय तुला न्याय मिळवून देण्यासाठी. तेव्हा नक्की वाटत या लोकांचे Candle Light मोर्चे, #justiceForAsifa. Tweets, Facebook Comments वाया नाही जाणार. प्रत्येकाचे तुला न्याय मिळवून देण्याचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश्य एकचं आहे. जेव्हा आम्ही तुझ्या न्यायासाठी एकत्र आलो ना तेव्हा किती हिंदू आलेत, किती मुस्लिम आलेत, किती ख्रिश्चन आलेत हे नाही मोजलं कोणी, त्याची गरजच पडली नाही. कारण तेव्हा माणुसकी एकत्र आली होती. अजूनही मेलेली नाही आहेत हि मन.
माझ्यासारखी एक मुलगी आज जर हा विचार करतेय कि माझ्या पासून दूरच्या राज्यात राहत असलेल्या माझ्या एका बहिणीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी तर असले विचार तुला आज अनेकजणांमध्ये सापडतील. आहोत तर शेवटी आपण भारतमातेची मुलं ना?
जेव्हा जेव्हा इथे अत्याचार झालाय, तेव्हा या अत्याचाराला थांबवण्यासाठी कोणी ना कोणी शक्ती जन्माला आलीय. कधी ती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तलवारीनं अन्यायाची चिरफाड करायला आली, तर कधी भगतसिंग-आझादांचे रूप घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला आली. राक्षसांचा अत्याचार वाढल्यावर प्रत्यक्ष देवी सुद्धा जिथं कालीच रूप घेऊन राक्षसांचा नायनाट करायला प्रकटते, तिथे तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार आम्ही.
तुला न्याय मिळेल नक्की मिळेल. जेव्हा त्या नराधमांना शिक्षा होईल तेव्हा तुझा समाधानी चेहरा नजरेसमोर येईल, जो पाहून आमच्या जीवाची घालमेल नक्की थांबेल, कारण तेव्हा माझ्या या बहिणीला न्याय मिळालेला असेल.

© वृषाली

What “She” Wants??


मध्यंतरी एक चित्रपट पाहण्यात आला माझ्या, जितेंद्र नायक असलेला. ज्यामध्ये तो एक शिल्पकार असतो आणि त्याला जीवनातली सर्वोत्कृष्ट कलाकृती घडवायची असते. तो अगदी दिवस-रात्र एक करतो त्यासाठी. कलाकृती असते एका स्त्री ची. सर्व शिल्प अगदी मनाजोगतं घडवलेलं असत त्यानं, पण त्या स्त्री च्या रिकाम्या हातात असं काय दाखवायचं कि जेणेकरून ते शिल्प जगाला अगदी परिपूर्ण वाटेल, हेच त्याला कळत नसत. कधी तो तिच्या हातात फुल ठेवून पाहतो, कधी वीणा, तर कधी काय पण त्याला ते चित्र पूर्ण वाटतच नाही. त्याचा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, कि एका स्त्री च्या हातात असं काय शोभून दिसेल ज्यामुळे ती परिपूर्ण वाटेल? शेवटी त्याचा प्रश्न सोडवतो एक लहान मुलगा, त्या स्त्री च्या हातात एका लहान बाळाची प्रतिकृती देऊन. तेव्हा त्याला त्याच ते शिल्प पूर्णही वाटत नि जगातली सर्वोत्कृष्ट कलाकृती घडवण्यातही तो यशस्वी झालेला असतो. असाच काहीसा विषय आहे माझा आजचा. तिला काय हवं असत?
"What “She” Wants??"
" ती " . . . . . .
आपल्यातली ती म्हणजे "स्त्री". जी अनेक रूप घेऊन आपल्या आयुष्यात येते. आई, आजी, बहीण, पत्नी, मैत्रीण. पण या सर्वांपेक्षाही तिची एक वेगळी ओळख असते, ते म्हणजे ती एक स्त्री असते. अगदी आपल्याच Generation प्रमाणे बोलायचं झालं तर "ती" म्हणजे एक मुलगी.
काय हवं असत एका मुलीला? मुलीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप मोठा प्रश्न आहे हा. पण इतरांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर अगदी सहज-सोपा, पटकन काहीतरी उत्तर देता येणारा प्रश्न. बऱ्याच वेळा आपण या प्रश्नाची आपल्या परीनं काहीतरी साचेबद्ध उत्तर ठरवलेली असतात, नि दरवेळी हीच तिला सांगण्यात येतात. "ती" House Wife आहे तर हा घे दर महिन्याचा ठराविक पगार, घर-दार, मुलांना सांभाळ. "ती" विद्यार्थिनी आहे तर, अमुक एका चांगल्या शाळेत नाव घातलंय तुझं, आता चांगले मार्क पाडून, अगदी बोर्डात वगैरे येऊन दाखव कारण आम्ही तुझ्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. कधी कधी तर “तिला” हे शिक्षण सुद्धा नशिबी नसते मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असे विचार आजही काही काही ठिकाणी पाहायला मिळतात. "ती" नोकरी करतेय तर हे नोकरी वगैरे लग्न ठरेपर्यंतच ठीक आहे नंतर सासरचे लोक म्हणाले तर सोडावी लागेल हं नोकरी.
बस समाजानं त्याच्या मर्यादा तिच्यासाठी केव्हाच आखून ठेवल्यात. तिला काय हवं याचा विचार क्वचितच कोणीतरी करत. "ती" आई असेल तर तीन घर आणि मुलांना संभाळायला हवं. "ती" मुलगी असेल तर शिक्षण-नोकरी यांची कसरत पार पाडून सुस्थळी पडायला हवं, "ती" बहीण असेल तर तिच्या संरक्षणाची जबादारी भावाने घ्यायला हवी. यादी वाढवली तर खूप मोठी होईल. पण खरंच का हे गरजेचं आहे?
नाही अजिबात नाही. आई हि केवळ house wife नसते. She is a Home Maker. ती फक्त नऊ महिने मुलांना पोटात वाढवत नाही तर, त्यांना शिक्षण, चांगले संस्कार देऊन या जगात पुढे जाण्यासाठी, समाजातल्या वाईट प्रवृतींविरुद्ध लढण्यासाठी तयार करते. नवऱ्याने दिलेल्या पगारात घरखर्च चालवणे, मुलांना हवं नको ते बघणे, घरातल्या इतर लोकांची काळजी घेणे या सर्वांचं Management शिकण्यासाठी ती काय कोणता Special Course नाही लावत. ते ज्ञान तिला उपजतच असत. आणि यावरूनच तिच्या शक्तीची, अस्तित्वाची खरी ओळख आपल्याला पटायला हवी. एका मुलीचं शिकून, नोकरी करून सुस्थळी लग्न करण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? नाही. ती शिकून कल्पना चावला होऊ शकते, प्रतिभा ताई पाटील होऊ शकते, अगदी मदर तेरेसा पण होऊ शकते. आपली संस्कृती निश्चितच तेवढी महान आहे कि अशा स्त्रिया आपण घडवू शकतो. भावाला राखी बांधून तीच रक्षण होणार असेल तर मग तीच अस्तित्व ते काय? तिला हि स्व-संरक्षणाचे धडे मिळूदेत कि! जर ती लक्ष्मी असू शकते तर ती वेळ प्रसंगी दुर्गा- काली पण बनू शकते. स्वतःच संरक्षण स्वतः करू शकते.
हे सर्व करण्यासाठी "तिला" हवं असत "मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य". एका मुलीला जेव्हा मनाप्रमाणे जगता येत ना तेव्हा तीच आयुष्य परिपूर्ण होत. मनाप्रमाणे स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काही करायला मिळालं तर त्या पुढे जाऊन आशा भोसले - मेरी कोम होतील, मनाप्रमाणे स्व-संरक्षणाचे धडे घेतले तर उद्या त्या किरण बेदी - मीरा बोरवणकर बनतील. कोण म्हणत स्त्रिया पुरुषांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात सहज वावरू शकत नाहीत? अरे तिच्यातल्या स्त्रीला फुलू द्या, मनासारखं थोडं तरी जगू द्या. आपली मते तिलाही ठामपणे मांडू द्या, जी स्त्री एका जीवाला जन्म देऊन त्याच योग्य लालन-पालन करून त्याला लहानाचं मोठं करते, तीच स्त्री इंदिरा गांधी बनून पूर्ण देश चालवू शकते हे विसरून कसं चालेल आपल्याला? सांगण्याचं तात्पर्य इतकच कि तिला तिच्या मर्जीनं जगू द्या. नका घालू बंधन तिच्यावर समाजाच्या जुन्या रूढी-प्रथांची. अश्या प्रथा ज्या फक्त पुरुषांना हवं ते करायची मोकळीक देतात नि स्त्रियांना उंबरठ्यापलीकडेही पाऊल टाकू देत नाहीत.
असे गैरसमज नका करून घेऊ कि स्त्री तिच्या स्वातंत्र्याचा गैर वापर करेल. एखाद्या मुलीची ओळख ती काय घालते, किती बिनधास्त वागते, यावरून कधीच ठरत नाही. तिची खरी ओळख तिच्या कर्तृत्वावरून ठरते. वागत असेल ती बिनधास्त, घालत असेल Fashionable कपडे पण तीच स्त्री एका Company ची Boss बनून ती यशस्वीरीत्या चालवून दाखवते तेव्हा तीच कौतुक करायला आपण का नाही पुढे होत? Company साठी तीन दिलेलं योगदान, तिचा वेळ, मेहनत, कष्ट हा एका पुरुषापेक्षा वेगळा का असतो? उलट तीन तर घर सांभाळून हे कर्तव्य पार पाडलेले असत, तीच तर जास्त कौतुक करायला हवं अश्या वेळी आपण. पण नाही आपण लक्षात ठेवतो ते तिचे Dress Code, तीन केलेली Fashion, तीच बिनधास्त वागणं-बोलणं, नि यावरूनच तिला Character Certificate देऊन मोकळे होतो. काय अधिकार आहे आपल्याला असं करण्याचा?
कित्येकदा असे अनुभव मलाही आलेत, अगं वृषाली किती बदललीस तू? इतकी बिनधास्त कशी राहतेस? मान्य आहे मला कि आधी मी खूप वेगळी होते, पण आयुष्यात कधी कधी अश्या घटना देखील घडतात ज्या आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात. मलाही बदललं त्या घटनांनी. पण माझ्या DP आणि Profile Pic वरून तरी तुम्ही मला Judge नाही करू शकत ना? That Fame & Dp Doesn't Define Me. माझे DP आणि Profile Pic हि माझी फक्त बाहेरच्या जगासाठी ओळख आहे, ते माझं Profession आहे. ती actual वृषाली नाही. माझ्या माणसांसाठी असलेली मी आणि बाहेरच्या लोकांसाठी असणारी माझी ओळख यात जमीन आकाशाचं अंतर आहे. मी मुंबईमध्ये आले म्हणजे माझं जग नाही बदललं. माझ्या माणसांसाठी मी पूर्वीसारखीच आहे आणि माझ्यासाठी तुम्हीही तसेच आहात. माझे Friends, माझी माणसं ज्यांना मी सगळं काही Share करू शकते. मला माझ्या Dressing आणि DP वरून judge करण्यात काहीच अर्थ नाही. That Never Define Me. या सर्व गोष्टींना महत्व न देता माझ्याकडे पाहाल तर तुम्हाला नक्कीच जाणवेल कि अरे हि तर आपलीच वृषाली आहे, जशी आधी होती तशीच आजही आहे.
सांगायचं मुद्धा इतकाच कि कधीच “का रे भुललासी वरलिया रंगा” असं होऊ देऊ नका, Specially “तिच्या” बाबतीत. कधी कधी आपणच तिला कमी लेखतो, वेळप्रसंगी स्त्रिया सुद्धा स्त्रियांच्या वैरी होतात. ऑफिस मध्ये कामाशी काम ठेवत जा, कामासाठी जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ, कामाच्या नादात घराकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणजे झालं, बस झालं शिक्षण आता लग्नाचं बघुयात, तू मुलगी आहेस अमुक एका क्षेत्रामध्ये मुलींचं काय काम असत? असं बोलून आपणच तीच मन नकळत दुखवत असतो. तिला पुढे जाण्यास मनाई करत असतो. थोडासा विश्वास तिच्यावर सुद्धा दाखवूयात ना. तुला पुढेच जायचं आहे ना, काम करायचं आहे ना, तू कर आमचा तुला पाठिंबा आहे, इतकंच काय पूर्ण विश्वास आहे तू यशस्वी होशील असं कधी बोलून बघा, तिच्या चेहऱ्यावर त्या वेळी जग जिंकल्याचा आनंद दिसेल तुम्हाला. आपली मानसिकता बदलून, तिच्याशी स्पर्धा न लावता तिला बरोबरीनं वागवा. मग बघा आपला समाज बदलायला वेळ लागणार नाही. तिला तिची ओळख निर्माण करू द्या यामुळे फक्त तिचाच आत्मविश्वास वाढेल असं नाही तर तुमच्याही घराण्याचं नाव उज्वल होईल. मुलगा हा वंशाचा दिवा असला तर मुलगी हि वंशाची प्राणज्योत असते. तिला कधीच कमी लेखू नका.
स्त्री म्हणजे फक्त प्रेम, वासल्य, स्नेह, ममता नाही तर स्त्री म्हणजे शक्ती, मेहनत, जिद्द सर्वकाही आहे. यासाठी "तीला" हवंय "तिच्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य", ते तिला द्या. मग बघा एक नवीन सुरवात होईल आणि ती नक्कीच होईल . . .
© वृषाली

माझे पुस्तक अनुभव - ययाती

नमस्कार मंडळी,
असं म्हणतात की पुस्तक जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा कळत नकळत ती आपल्याला बरच काही शिकवून जातात. पुस्तकांपासून काही आकलन झालं नाही तर ते नुसतं वर वरच वाचन ठरत. खरं पुस्तक वाचन म्हणजे नुसतं पुस्तक समजून घेणं नव्हे तर पुस्तक वाचता वाचता आपण
स्वतःला समजत जातो ते खर पुस्तक वाचन.
हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.
तीन प्रमुख पात्रांनी त्यांच्याच तोंडून जी स्वतःची कहाणी सांगितलीय ती अतिशय उत्कंठावर्धक आहे. ययाती, देवयानी अथवा शर्मिष्ठा कोणाचीही कहाणी वाचताना असंख्य प्रश्न मनाच्या तळाशी उमटतात, कि हे असं का झालं? यांना नेमकं हवं तरी काय होत? खरंच आपल्या सुखांसाठी, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी इतकी का वाहवत जातात माणसं?
या तिघांच्या ही मनोगतांनी जो परिणाम माझ्या मनावर केला त्याचाच हा अनुभव आहे. आवडला तर तसं नक्की सांगा.
माझ्या मते सांगायला गेलं तर, प्रत्येकाची सुखाची व्याख्याच वेगळी होती, म्हणून प्रत्येकाची अपेक्षा बदलत गेली, प्रत्येकाचा जीवनाविषयी दृष्टिकोन बदलत गेला. स्त्रीच्या सर्व रूपात ज्याला फक्त प्रेमच हवं होत असा ययाती. तो दरवेळी प्रेमाला पारखा होत गेला, कधी आईच्या वात्सल्य प्रेमाला, कधी पत्नीच्या प्रेमाला, तर कधी प्रेयसीच्या प्रेमाला. सूडाच्या नि क्रोधाच्या भावनेत अडकलेल्या देवयानीला हवा असतो तो प्रतिशोध. जो तीन कधी कचावर घेतला, कधी शर्मिष्ठेवर, तर कधी ययातीवर. शर्मिष्ठा राजकन्या असूनही देवयानीच्या सूडभावनेमुळे तिला दासी व्हावं लागलं. सर्वच नात्यांना पारखी झालेली ती, तिला हवं असत प्रेम, समजून घेणार माणूस. पण तिला सुद्धा ते कधी कचाला भाऊ मानून मिळवावं लागलं, तर कधी ययातीला पती मानून.
प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या त्यांच्या गरजेनुसार बदलत गेल्या. ययाती पासूनच सुरवात करायची झाली तर . . . .
“ययाती”- त्याच जीवन म्हणजे फक्त प्रेमाचा शोध इतकंच मर्यादित राहिल्यासारखं वाटत. त्यानं मिळवलेलं प्रेम त्याला शेवटपर्यंत कमीच पडत राहत. त्यानं आईच्या प्रेमाची अपेक्षा करावी तर आईला मुलावरच्या प्रेमापेक्षाही स्वतःच सौंदर्य नि राजघराण्याची प्रतिष्ठा महत्वाची वाटली. अगदी एका दासीलाही आई म्हणण्याइतपत ययाती वर वेळ यावी इतका तो आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. देवयानी पत्नी म्हणून आयुष्यात आली खरी पण देवयानी फक्त आणि फक्त तिला हवं असेल ते मिळवण्यासाठी त्याचा वापर करत राहिली. ययातीवर निरपेक्ष प्रेम कोणी केलं असेल तर ते शर्मिष्ठेनं, पण दुर्दैवानं तिचीही साथ मधेच सुटली. शर्मिष्ठा आयुष्यातून निघून गेल्यानं सैरभैर झालेला ययाती, अजूनच वासनेच्या आहारी गेला. आयुष्यभर तो फक्त आणि फक्त सुखोपभोगच घेत राहिला. वासने पुढे नि मद्याच्या धुंदीपुढे त्यानं सर्व नाती तुच्छ मानली. शेवटी शेवटी तर तो इतका वासनामग्न झाला कि शापामुळे आलेल्या वार्धक्यासाठी त्यानं स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी कुठलाही आडपडदा न ठेवता त्याला जगाला सांगावीशी वाटली.
कथेमधील दुसरी व्यक्ती म्हणजे "देवयानी". कचाने जिच्या प्रेमाला प्रतिसाद न देता कर्तव्याला प्रेमापेक्षा जास्त महत्व दिल अशी देवयानी. कच निघून गेल्यावर तिच्या मनावर मोठा आघात होतो. नि या सर्वात भर पडते ती शर्मिष्ठा आणि देवयानीच्या भांडणाची. अहंकारी देवयानी शर्मिष्ठेवर सूड उगवण्यासाठी तिला स्वतःची दासी बनवून हस्तिनापूरला घेऊन येते. अपमानित झालेली व्यक्ती आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे खांडेकरांनी देवयानीच्या रूपात पूर्णपणे व्यक्त केलंय. कदाचित देवयानी हि ती स्त्री नसावीच जी ययातीला अपेक्षित होती. पत्नीच्या रूपात त्याला एक मैत्रीण, समजून घेणारी जोडीदार आणि निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. पण देवयानी कायम आपल्या सौंदर्याच्या, अहंकाराच्या जगातच राहिली. शुक्राचार्यांपेक्षा श्रेष्ठ तिच्यासाठी कधीच कोणी नव्हतं. ती कायम जे तिला हवं तेच करत राहिली. मग त्यासाठी तीन कधी आपल्या सौंदर्याचा अधिकार ययातीवर गाजवला, तर कधी महाराणी पदाचा आपला अधिकार दाखवला. खर प्रेम भोगात नसून त्यागात असत हे सत्य तिला देखील आयुष्याच्या शेवटी कळलं.
तिसरी नि महत्वाची व्यक्ती म्हणजे “शर्मिष्ठा”. ती जितकी महत्वाची तितकीच आदरणीय. ययाती आणि देवयानी यांच्यापेक्षा खूप वेगळी असलेली शर्मिष्ठा मनाला खूप भावली. खूप काही शिकवून सुद्धा गेली. तिच्याही वाट्याला दुःख आली, पण त्याहीपेक्षा तिची त्या दुःखाला सोसण्याची तयारी खूप मोठी होती. खरं प्रेम निस्वार्थी असत, नि सुखापेक्षाही जास्त मोठा आपण आपल्या माणसांसाठी केलेला त्याग असतो, तो त्याग आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवतो हे तिला खूप लवकर उमगलं होत. म्हणूनच तर आई वडिलांसाठी देवयानीची दासी होणं तीन आनंदानं मान्य केलं, ययाती साठी ती सर्व काही सोडून वनवासी सुद्धा झाली. ययातीवर तीन अगदी निरपेक्ष प्रेम केलं होत. कदाचित म्हणूनच १८ वर्ष दूर राहूनही ती मनोमन फक्त ययातिचीच पूजा करायची. जेवढी हट्टी, तापट आणि संतापी देवयानी होती तितकीच शांत, प्रेमळ, नि समजूतदार शर्मिष्ठा होती. त्या दोघी म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. दैवाचे इतके आघात सोसूनही तीच ययातीवरच प्रेम कुठेही कमी होत नाही. कारण तिच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नव्हता कि कसलीच मागणी नव्हती. प्रेमात मोठ्यातला मोठा त्यागही तीन आनंदानं स्वीकार केला. कादंबरीच्या बहुतांश पात्रामध्ये काही ना काही दोष असूनही शेवटी सगळ्यात निर्दोष उरते ती शर्मिष्ठा.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी ययाती, देवयानी, शर्मिष्ठा जन्माला आले आहेत. येत राहतील.खरं तर हि पात्र नसून या समाजातील प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना आहेत. ज्या प्रसंगानुरूप बाहेर येत असतात. प्रत्येकाच्या मनात एक ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, कच, हे कुठेतरी लपलेले आहेत. कारण माणसामध्ये जस अहंकार, महत्वकांक्षा, सूड या विकृती असतात तसं प्रेम, त्याग, ममता या प्रवृत्तीही असतात. कधी कधी आपणही रागाच्या भरात एखादी चूक करून बसतो, मोहामध्ये भरकटून जातो, आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेमही करतो.
शेवटी काय जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत, कोणतीही गुंतागुंत न वाढवता जाणून घ्यायचं असेल तर अवश्य वाचा "ययाती".



© वृषाली