Sunday, April 2, 2017

. . . . कर्ण . . . .

                                                           
                     

      कर्णाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. मृत्युंजय वाचताना हे कधीच वाटलं नव्हतं कि हे पुस्तक आपलं सगळ्यात आवडीचं पुस्तक बनेल. आणि कर्ण कायमचा मनात घर करून राहील. त्याच्या दानशूरतेला तोड नव्हती. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, सर्वश्रेष्ठ दानवीर होता, आणि एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती होता. कर्णाबद्दल माहित असलेल्या काही कथांचा संग्रह आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. अर्थात या कथांचा संग्रह मी काही मित्र मैत्रिणी, Google, Facebook इत्यादी माध्यमातून केलाय. तुम्हालाही त्या आवडतील अशी अपेक्षा करते.

१.    एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ  दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला,
हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
   
       अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.आता अर्जुन अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही.
   
        मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की......." या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या". लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की....." या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत". एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....
या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
   
        कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला "अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!" तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!
   
         कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
     
         व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे. शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............⁠⁠⁠⁠





२.      एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ”कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.” या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ”श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.” सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ”ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.”

        पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ”राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.” धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ”काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?” सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.
     
       त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, “एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?” असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ”कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?” त्यावर कर्ण उद्गारला, ” या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?”

     दान देताना सुद्धा त्याने मनात किंचितही कौतुकाची अपेक्षा ठेवली नाही अशा या जेष्ठ दानवीराला माझे कोटी कोटी प्रणाम





                                      कर्णाविषयी प्रकाशित काही पुस्तके जी अवश्य वाचली पाहिजेत

     १. मृत्युंजय  -  शिवाजी सावंत

     २. राधेय  -  रणजीत देसाई

     ३. कौंतेय  -  वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

     ४. धर्मयुद्ध  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ५. श्री कर्णायन  -   गो. नी. दांडेकर

     ६. कर्णपर्व  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ७. कर्ण  -  अनंत पै

     ८. शोध कर्णाचा  -  डॉ. श्रीराम पंडित


© वृषाली 

No comments:

Post a Comment