Saturday, January 12, 2019

माझे पुस्तक अनुभव - मृत्युंजय

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, खरं तर हि Post मला सर्वात पहिलीच लिहायची होती, पण कर्णावर लिहायचं म्हटलं तर किती लिहु, आणि काय लिहु समजतच नाही. कर्णावर लिहिण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात मला. पण तरीही प्रयत्न केलाय मृत्युंजय वाचून मला जो कर्ण समजला तो मी तुमच्या समोर मांडतेय, Post जरी मोठी असली तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. काही सूचना असल्या तरी अवश्य कळवा.
मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.
त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.
प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.
आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी.
जास्त दूर कशाला माझीच गोष्ट घ्या ना, खरं तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ग्रुप वर लिहणं इतकंस योग्य नाही. पण तरीही कर्णाच माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे माझं पूर्ण जीवन कर्णमय आहे. पाच वर्षांपूर्वी मी एक अशी मुलगी होते जिने आयुष्यात सर्वकाही गमावलं होत. आत्मविश्वास हरवला होता तर एकीकडे स्व पणाची जाणीव मरून गेली होती. जगणंच विसरून गेले होते मी. पण मृत्युंजय वाचलं नि कर्ण भेटला. गेलेला आत्मविश्वासच नाही तर हरवलेलं आयुष्य सुद्धा परत मिळालं मला. पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला. मला तर एक असा स्रोत मिळाला या पुस्तकांमधून कि ज्यानं मला माझं आयुष्य नव्यानं जगायला शिकवलं. त्या स्रोताचे नाव म्हणजे "कर्ण". शेवटी इतकच सांगावस वाटत,
!! कर्ण काय आहे, एक नाव मनात जपलेलं,
त्याच्या एका नावात, माझं आयुष्य एकवटलेलं,
ज्या मृत्युंजयान जगालाही जिंकलेलं,
राधेयान त्या मला नवीन आयुष्य दिलेलं !!
© वृषाली

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, खरं तर हि Post मला सर्वात पहिलीच लिहायची होती, पण कर्णावर लिहायचं म्हटलं तर किती लिहु, आणि काय लिहु समजतच नाही. कर्णावर लिहिण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात मला. पण तरीही प्रयत्न केलाय मृत्युंजय वाचून मला जो कर्ण समजला तो मी तुमच्या समोर मांडतेय, Post जरी मोठी असली तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. काही सूचना असल्या तरी अवश्य कळवा.
मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.
त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.
प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.
आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी.
जास्त दूर कशाला माझीच गोष्ट घ्या ना, खरं तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ग्रुप वर लिहणं इतकंस योग्य नाही. पण तरीही कर्णाच माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे माझं पूर्ण जीवन कर्णमय आहे. पाच वर्षांपूर्वी मी एक अशी मुलगी होते जिने आयुष्यात सर्वकाही गमावलं होत. आत्मविश्वास हरवला होता तर एकीकडे स्व पणाची जाणीव मरून गेली होती. जगणंच विसरून गेले होते मी. पण मृत्युंजय वाचलं नि कर्ण भेटला. गेलेला आत्मविश्वासच नाही तर हरवलेलं आयुष्य सुद्धा परत मिळालं मला. पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला. मला तर एक असा स्रोत मिळाला या पुस्तकांमधून कि ज्यानं मला माझं आयुष्य नव्यानं जगायला शिकवलं. त्या स्रोताचे नाव म्हणजे "कर्ण". शेवटी इतकच सांगावस वाटत,
!! कर्ण काय आहे, एक नाव मनात जपलेलं,
त्याच्या एका नावात, माझं आयुष्य एकवटलेलं,
ज्या मृत्युंजयान जगालाही जिंकलेलं,
राधेयान त्या मला नवीन आयुष्य दिलेलं !!
© वृषाली

माझे पुस्तक अनुभव - व्यक्ती आणि वल्ली

मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील सर्व मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार. आजचा माझा पुस्तकानुभव हा अनुभव नसून एक शिकवणमाला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे "व्यक्ती आणि वल्ली" हे पुस्तक, खरं तर दहावी मध्ये असतानाच हे संपूर्ण पुस्तक वाचून झालं होत, नि आजवर त्याची कितीतरी पारायण झाली आहेत. पण म्हणतात ना पुस्तक वाचन आणि वाचलेलं पुस्तक समजणं यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. या ग्रुप वर अनुभव लिहायला लागले तेव्हा ते ऐतिहासिक-कादंबऱ्या, पौराणिक-कादंबऱ्या, रसग्रहण याच प्रकारात जास्त लिहलेत. म्हणून यावेळी थोडासा वेगळा प्रयत्न करून पाहिलंय. पु. ल. म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो अखंड वाहणारा निर्मल हास्याचा निर्झर. त्यांच्या विनोदी कथांनी लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावलंय.
जर एखाद्या लेखकाला त्याची शिकवण लोकांपर्यंत पोहचवायची असेल तर त्याला त्याच साहित्य ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्यकथा, कविता, विनोद अशा प्रकारच्या साच्यात बसवायची गरजच पडत नाही मुळात.
एक यशस्वी लेखक तोच असतो जो कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत असतो. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्लीनी देखील असच वेड लावलं मला. त्यात फक्त विनोद नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला दिलेली शिकवण आहे, सामान्य व्यक्ती तर आपण सगळेच असतो, पण आपल्यातही काही माणसं अशी असतात जी कळत-नकळत आपल्याला बरच काही शिकवून जातात. जीवनाचे धडे देतात, नि अशाच व्यक्ती त्यांच्या वेगळेपणामुळे "वल्ली" म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही वल्लींची शिकवण मी आज आपल्यासमोर मांडतेय. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाची हि शिकवणमाला म्हणजे या पुस्तकाचा वेगळ्या अर्थाने मांडलेला अनुभव आहे, आपणा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते.
• हरितात्या - एक इतिहास वेडा माणूस
पु. लंच्या हरितात्यांना वेड होत ते इतिहासाचं. त्यांचं हे वेड आपल्याला नकळत शहाणं करून जात. आयुष्य जगण्यासाठी सुद्धा असच एक वेड असल पाहिजे, आपल्या धेय्याच वेड. आपल्या धेय्याकडे वाटचाल करताना वाटेत अनेक अडचणी येतील पण जे आपल्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन नि जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा आपल्या आयुष्यातील एक आवश्यक घटक मानून पुढे चालत राहणे हेच तर जास्त महत्वाचं असत नाही का? आता तुम्ही म्हणाल विरोधक कशाला, विरोधक सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. आपलं कुठे चुकतंय ते समजायला, जीवनाच्या गाडीला कुठे ना कुठे गतिरोधकांची गरज पडतेच पडते त्याशिवाय जीवनाचा प्रवास सुखकर होत नाही.
हरितात्यांचे सवंगडी म्हणजे लहान मुलं, पण ते लहान मुलांतही लहान मुलं होऊन मिसळायचे. त्यांच्यावर इतिहासकालीन कथांद्वारे चांगले संस्कार करायचे. आपल्या कामातून आपण कुणाचंतरी भलं करतोय, कुणाच्यातरी आयुष्यात एक आवश्यक घटक बनून राहतोय हे का कमी आहे? हरितात्यांसारखेच पुराव्याने शाबीत करण्यासारखे जगूयात नि आपल्या चांगल्या कामाने सर्वांचे मन जिंकूयात.
• नामू परीट - एक स्थितप्रज्ञ
पु. लंच्या नामूला स्थितप्रज्ञ म्हटलंय म्हणजे तो अगदीच भावरहीत, शांत या अर्थानं नव्हे बरं. स्थितप्रज्ञ म्हणजे आल्या परिस्थितीला शांतपणे सामोर जाणारा माणूस, असा अर्थ घेतलाय इथे.
माणसाची परिस्थिती कधीच समान नसते, प्रत्येकालाच चांगल्या-वाईट, गरीब-श्रीमंत, सर्व परिस्थितीतून जावं लागत. अशा परिस्थितीतही न डगमगता उभा राहतो तो माणूस. हीच शिकवण नामू परीट वाचताना मिळते. त्याची परिस्थिती चांगली-वाईट, गरीब-श्रीमंत अशी बदलत जाते, अगदी तो जेल मध्ये सुद्धा जाऊन येतो पण शेवटी सर्व परिस्थितीवर मात करून तो या पांढरपेशा समाजात ताठ मानेन उभा राहतो.
आपल्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीला आपण किती महत्व द्यावं हे आपल्या हातात असत, बहुतेक वेळा आपल्या हातून घडलेल्या वाईट गोष्टी आपण विसरू शकत नाही, किंबहुना कधी कधी समाज त्या गोष्टी आपल्याला विसरू देत नाही. भुतकाळातील अशा गोष्टी विसरून याच चुका परत करू नयेत नि समाजात ताठ मानेन जगायला शिकावं हेच तर सांगतो पु. लंचा नामू आपल्याला.
• नंदा प्रधान - यक्ष
पु. लंचा हा यक्ष मात्र मनावर फार मोठा आघात करून गेलाय. एखादी अशी व्यक्ती ज्यानं आयुष्यात खूप दुःख पाहिलीत, तिला नंदा प्रधान खूप जवळचा वाटेल, अगदी माझ्यासारखाच.
असं म्हणतात कि यक्ष-यक्षिणी खूप सुंदर असतात. आपल्या अस्तित्वाने ते आजूबाजूचं वातावरण देखील सुंदर बनवतात. पण ते स्वतः मात्र आतून खूप दुःखी असतात कारण त्यांच्या आयुष्याला शाप असतात.
नंदाने सुद्धा लहानपणापासून खूपकाही सहन केलेलं असत, खूप काही भोगलेलं असत. आणि म्हणूनच कि काय छोट्या छोट्या सामान्य सुखाचं सुद्धा त्याला अप्रूप वाटत.
आपण सुद्धा कधी कधी मोठं दुःख आल्यावर खचून जातो, जगण्याची उमेद हरवून बसतो, नि त्या दुःखाखालीच चिरडली जातात आपली छोटी छोटी सुख, जी आपल्याला आपल्या व्यथांपुढे दिसूनच येत नाहीत. भलेही त्यांचं अस्तित्व काही क्षणाचं असेल पण असे क्षण आपल्याला जगण्याची उमेद देऊन जात असतात.
त्यामुळे प्रत्येक मोठ्या दुःखातही आपली माणसं, आपले छोटे सुखाचे क्षण कधीच विसरू नयेत. कारण तीच आपली जगण्याची सर्वात मोठी शक्ती असते. प्रत्येक संकटात ती आपल्याला तारून नेते.
• चितळे मास्तर - एक आनंद स्रोत
काही काही माणसं जन्माला येतात तीच मुळात दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. चितळे मास्तर म्हणजे देखील असाच सदा दुसऱ्यांना आनंद देणारा कल्पवृक्ष. त्यांचं जीवन त्यांनी फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलं होत.
ओळीत फक्त आठ शब्दच लिहायची सक्ती करणारे, वर्गातल्या मुलांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे चितळे मास्तर मुकुंदाच्या पोलिओ झालेल्या मुलीला गोष्ट सांगताना मनाला हेलावून जातात.
चांगली माणसे पण अशीच असतात त्यांना फक्त दुसऱ्यांना आनंद देणं इतकंच ठाऊक असत. मग त्यासाठी त्यांना वय, स्थळ-काळ-वेळ काहीच आडवं येत नाही. चांगल्या माणसांचा चांगुलपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतो.
आपणही आपल्या चांगल्या वागण्याने इतरांच्या असच उपयोगी पडलं पाहिजे नाही का? आपल्याला कळणार सुद्धा नाही इतक्या सहजपणे आपण दुसऱ्यांना आनंद देत असतो. जगासाठी भले ती छोटी गोष्ट असो, पण ज्याला तो आनंद मिळालाय त्या माणसासाठी ती जगातली सर्वात मोठी गोष्ट असते. म्हणून नेहमी इतरांना आनंदी ठेवुयात.
• हंड्रेड परसेन्ट पेस्तन काका
पेस्तन काका वाचल्यावर समजलं कि प्रेमाला वयाच बंधन असूच शकत नाही. पेस्तन काकींची पेस्तन काका घेत असलेली काळजी पाहून वाटलं कि प्रेम असावं तर असं.
आपली प्रेमकथा पण ते ज्या दिलखुलासपणे लेखकाला सांगतात ते वाचून वाटत हल्लीच्या काळात नाही सापडायचा असा प्रांजळपणा. लग्नाला साठ वर्ष झाल्यावर सुद्धा She is a very good girl!!!! म्हणायचे ते वाचून प्रेमाची एक नवीन व्याख्या समजली. प्रेम म्हणजे लग्न, मुलं-बाळ, संसार हेच नव्हे, तर प्रेम म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास. उतारवयात घेतलेली आपल्या जोडीदाराची काळजी. त्यांच्या चांगल्या वाईट सवयींची असलेली जाणीव, नि त्यांना सर्व गुण-दोषांसह स्वीकारणं.
लग्न म्हणजे आपल्या जोडीदारासह आपण आयुष्याची केलेली वाटचाल, चांगल्या काळात मिळालेली त्याची साथ तर वाईट वेळेत असलेला हातात हात. पेस्तनकाकांचं प्रेम सुद्धा त्यांच्या सारखंच शंभर टक्के खरं होत. असच प्रेम आपणही आपल्या माणसांवर करूयात.
या होत्या पु. लंच्या काही वल्ली आणि त्यांची शिकवण. ज्या आपण आत्मसात करूयात आणि आयुष्याला एक नव्या दृष्टिकोनातून बघुयात.

© वृषाली

Friday, July 20, 2018

माझे पुस्तक अनुभव - क्रौंचवध

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रेम आणि कर्तव्य यांच्यापैकी कुणा एकाचीच निवड करायची असेल तर अशा वेळी आपण काय करावं? खांडेकरांची क्रौंचवध वाचताना नेमका हाच प्रश्न प्रत्येक प्रसंगानंतर मला पडत गेला. आणि आज मी तुम्हाला याच कादंबरीबद्दलचा माझा अनुभव नि अभिप्राय सांगणार आहे. हि कादंबरी अशी आहे ना कि म्हटली तर प्रेमकथा, म्हटली तर कर्तव्याची गाथा, पण कादंबरी वाचल्यावर वाचकांचे आपसूकच दोन गट पडतात यात वाद नाही. कुणाला वाटत यातली प्रेम कहाणी सफल व्हायला हवी होती. तर कुणाला वाटत नायकाने त्याच कर्तव्य पूर्ण केले तेच योग्य होत. शेवटी कोण योग्य नि कोण अयोग्य हेच आज मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. मी मनापासून प्रयत्न केलाय तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करते. तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
हि कादंबरी ज्यांच्याभोवती फिरते अशी दोन मुख्य पात्र म्हणजे दिनकर आणि सुलु. सुलु एका ध्येयवादी, बुद्धीने विचार करणाऱ्या माणसाची भावनिक, हळवी आणि संवेदनशील मुलगी. भाऊ-बहीण नसल्याने तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या दिनकरलाच ती सर्वस्व मानते. ज्यावेळी तिची आई हे जग सोडून जाते, तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती तिच्या वडिलांच्या आधाराची. पण बुद्धिवादी वडील भावनेला महत्व न देता मनाची शांती मिळवण्यासाठी सुलूला एकटी सोडून स्वतः एकांतात राहणे पसंत करतात. अशा वेळी तिला आधार देतो तो दिनकर. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून तिचा दिनकरवरचा विश्वास वाढत जातो. दिनकर तिच्यासाठी तीच सर्वस्व होतो. एका गाईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झालेला राजा दिलीप, रघूच्या दुसऱ्या सर्गातली हि दिलीप राजाची कथा वाचताना सुलु कळत-नकळत त्या राजामध्ये दिनकरला पाहते, नि म्हणूनच दिनकरच नाव ती दिलीप ठेवते. जगासाठी असलेला दिनकर हा तिच्यासाठी दिलीप होतो.
पण विरह नसला तर ते प्रेम कसलं असं म्हणतात. असाच एक विरह त्या दोघांच्याही वाटेला येतो. ज्यामध्ये दोघांच्याही वाटा वेगळ्या होऊन जातात. त्यांचं प्रेम हे अव्यक्तच राहत. पण कदाचीत नियतीला हे मंजूर नसावं. सुलूच लग्न होऊन जेव्हा ती सासरी येते तेव्हा तीच सासर नि दिनकरच गाव एकच असल्याचं तिच्या लक्षात येत. दुरावलेल्या वाटा पुन्हा जुळतात पण यावेळी दोघंही आपल्या आयुष्याच्या वाटेवरून बरीच पुढे चालून आलेली असतात. सुलु तिच्या संसाराच्या कर्तव्यांशी बांधली गेलेली असते तर दिनकर भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला असतो. पण या सर्वातही सुलूच्या मनात दिनकर विषयी आपुलकी, माया, जिव्हाळा लपलेला असतो. तर दिनकरच्या मनात चालू असते ओढाताण. दोन नात्यांची ओढाताण. एकीकडे प्रेम तर एकीकडे कर्तव्य. सुलूविषयी असणार अव्यक्त प्रेम त्याला एकीकडे खुणावत असत तर दुसरीकडे भारतमातेची हाक त्याला बोलवत असते. दोन नात्यांच्या या द्वंद्व युद्धात विजय एकाच नात्याचा होणार असंही राहून राहून त्याला वाटत असत. दोघांच्याही मनात प्रेम आणि कर्तव्य या नात्यांचं युद्ध चालू असलं तरी दोघांसाठी या नात्यांची व्याख्या मात्र खूप निराळी असते. सुलूच्या मनात दिनकरविषयी असणार प्रेम, त्याची वाटणारी काळजी आणि नवऱ्याप्रती असणार तीच कर्तव्य यांची ओढाताण तर दिनकरच्या मनात सुलूविषयी असणार अबोल प्रेम तर दुसरीकडे मातृभूमीबद्दल असणार कर्तव्य असं द्वंद्व. आणि दोन नात्यांचा हा प्रवास मला उलगडला तो एका निराळ्याच वळणावर.
दिनकरच्या मनात असलेलं सुलूबद्दलच प्रेम त्यानं शेवटपर्यंत तिच्याजवळ व्यक्त केलंच नाही. खूप जणांना याच वाईट वाटलं, अगदी मला सुद्धा एका क्षणापर्यंत हेच वाटत होत कि त्यांची प्रेम कहाणी सफल व्हावी, पण त्यामागे असलेली दिनकरची भूमिका लक्षात घेतली तर माझ्या खुज्या विचारांची मलाच लाज वाटली. भावनेला, पहिल्या प्रेमाला नि त्या प्रेमाच्या सफलतेला महत्व देणारे आपण आणि प्रेयसीच्या प्रेमापेक्षा ज्या भारतमातेला आपली जास्त गरज होती तिच्यासाठी प्राणार्पण करायला निघालेला दिनकर यामध्ये दिनकरच श्रेष्ठ ठरतो यात वाद नाही. पण असा त्याग करायला सुद्धा खूप मोठं मन, खूप मोठे विचार लागतात कदाचित हि आपल्यासारख्या सामान्य माणसांना जमणारी गोष्ट नाहीच. म्हटलं तर दिनकरला त्याच प्रेम व्यक्त करता आलं असत, सुलुशी लग्न देखील करता आलं असत. पण त्यानं तेव्हा विचार केला मातृभूमीचा, पारतंत्र्यात अडकून पडलेल्या त्याच्या बंधू-भगिनींचा. आपली परिस्थिती याहून निराळी नाही, आज जरा कुठे अन्याय झाला तर आपण काय करतो? TV वर बातम्या पाहून हळहळ व्यक्त करतो, whatsap वर, fb timeline वर post share करतो नि बस! आपलं कर्तव्य संपल्यात जमा करतो. आपल्यामध्ये १०० मधून एखादाच असा असतो जो या अन्यायाविरुद्ध लढतो, नि तोच दिनकरच आजच रूप आहे.
क्रौंचवध मधलाच एक छोटासा प्रसंग चार शब्दात सांगतेय तुम्हाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांची सभा घ्यायचं ठरत. ज्यांचा नेता दिनकर असतो. त्या सभेत काहीतरी घातपात होणार अशी बातमी पसरते नि त्यात दिनकरला मारणार असल्याची वार्ता सुलूपर्यंत येते. दिनकर ला वाचवण्यासाठी सुलु ती आजारी असल्याचं सांगून दिनकरला भेटण्यासाठी घरी बोलावते, दिनकर तिच्या काळजीनं तिला भेटायला येतोही, पण सभेत दंगा व्हायचा तो होतोच. दंग्याच्या वेळेस दिनकर सुलूजवळ असला तरी हि गोष्ट सुलु, तिचा नवरा, आणि दिनकर यांनाच ठाऊक असते. बाकी कुणालाही हि गोष्ट माहित नसल्याने दिनकर वर सभा उधळवून दंगा पसरवल्याचा आरोप करतात नि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. दिनकर निर्दोष असूनही फक्त सुलूची बदनामी टाळण्यासाठी तो गप्प बसतो. इतकी सहनशक्ती, आपल्या प्रेमावर बदनामीचे डाग पडू नयेत म्हणून केलेला त्याग केवळ अवर्णनीय आहे. मूळ क्रौंचवधाची कथा नि खांडेकरांनी मांडलेल्या दिनकराची कथा यात मला निश्चितच खूप साम्य आढळलं. क्रौंच पक्षाचे एक जोडपे झाडावर प्रेमालाप करीत बसलेले असते, पण एक भिल्ल येऊन त्यातल्या नरावर बाणाचा हल्ला करतो नि त्यात नर मृत्युमुखी पडतो. आपल्या जोडीदाराला गमावल्याचे दुःख सहन न होऊन मादी तिथेच आक्रोश सुरु करते. तिचा तो आक्रोश पाहूनच कि काय वाल्मिकी ऋषींना शोक अनावर होतो नि त्यांचा शोक एका श्लोकाच्या माध्यमातून प्रकट होतो. हि क्रौंचवध कथा नि दिनकरची कथा अगदी समरूप वाटली मला.
खांडेकरांनी त्या वेळी दाखवलेली समाजातील विषमता आजही आढळते. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरीही. आपल्या छोट्याश्या जगात सुखी असणारे जीव, म्हणजे आपला गरीब-मध्यमवर्गीय समाज. ज्यांच्या जीवनाकडून अपेक्षाही काही फार मोठ्या नसतात. पण काही सत्ताधारी लोकांना ते हि बघवत नाही. ते या ना त्या मार्गाने गरीब लोकांची अजून पिळवणूक करत राहतात. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात नि स्वतःसाठीच जगतात, त्यांचं जग स्वतःच्या पलीकडे नसतंच. गरीब अजून गरीब होत जातात तर श्रीमंत अजून श्रीमंत. नि मग अशा अत्याचारांना कंटाळून कोणीतरी एक दिनकर या सर्वांविरुद्ध लढायला उभा राहतो. त्या वाल्मिकींच प्रतीक म्हणजेच दिनकर, फरक इतकाच कि वाल्मिकींनी शस्त्र न उचलता भिल्लाला शाप दिला, तर दिनकर सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढायला उभा राहिला. दिनकरन ज्या पद्धतींनी गरीब लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणल्या, त्या पद्धतीनं जर आपण आज एकमेकांना समजून घेतलं तर एक निराळच जग तयार होईल. ज्यात जातीवाद, भेदभाव, गरीब-श्रीमंती नसेल. माणसाला माणुसकीच्या नजरेतून पाहता येईल. तो मरणाला घाबरला नाही कारण त्याला माहित होत त्याच्या मरणानं समाजात बदल घडून आला असता. क्रांतीची पूजा अश्रूंनी नाही तर भक्ताच्या रक्तानी करावी लागते. त्यातूनच नवे युग जन्माला येते. जस झाडाच्या फांद्या तोडल्या कि ते अधिक झपाट्याने वाढू लागते तसंच. जर वाल्मिकींसारखे महान ऋषी एका निष्पाप पाखराची हत्या बघून आपल्या साऱ्या तपश्चर्येवर पाणी सोडायला तयार होतात, तर आपली मन का मेली आहेत? आपण तर माणसं आहोत साधी. असे हजारो क्रौंचवध आपल्या आजूबाजूला होत असतात. आपल्यातल्या वाल्मिकीला पण आपण जाग करूयात ना! नि जे काही समाजाचं देणं लागतो ते देऊयात. नुसते गप्प बसून अन्याय सहन करण्यात काहीच अर्थ नाही, उद्या असं म्हणायची वेळ येऊ नये कि या स्वातंत्र्यापेक्षा ते पारतंत्र्य चांगलं होत.
अश्रू, शब्द आणि रक्त या सर्वांचा जन्म माणसांपासूनच होतो पण तिघांचेही मार्ग वेगळे असतात, नि त्यातूनच माणसाची माणुसकी ठरते. जो अन्याय सहन करून मूक अश्रू गाळतो तो भावनाशील माणूस, त्याची माणुसकी भावनेतून जन्म घेते नि भावनेतच मृत्यू पावते. जो सर्व काही बघून फक्त स्वतःची मत मांडतो त्याची माणुसकी बोलण्यात नि मत मांडण्यात व्यर्थ जाते. नि तिसरा प्रकार जो मनुष्य अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, अगदी लढून स्वतःचे रक्त सांडवायला तयार होतो तो खरा माणूस. ज्यांनी माणुसकी घडवून आणली, अशी माणसं फार कमी उरलीयत जगात. म्हणतात ना माणसे जन्माला येतात पण माणुसकी घडवावी लागते, त्रिवार सत्य आहे हे.
सरतेशेवटी सर्वांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देतेय, कि कोण योग्य नि कोण अयोग्य प्रेम कि कर्तव्य? मला तर इतकंच वाटत कि सर्वजण आपल्या आपल्या जागी योग्य आहेत. दिनकरन त्याच कर्तव्य पूर्ण करूनच समाजात बदलावं आणला. सुलून तिच्या प्रेमाप्रती निष्ठा दाखवून दिनकरचा जीव वाचवला. दोघंही आपल्या जागी योग्यच आहेत, बरोबर आहेत. कारण काही काही प्रेमकथा अपूर्ण राहूनच अजरामर होतात. नि काही काही कर्तव्य पूर्ण होऊनच नवीन समाज घडवतात. आपल्याला जगायची प्रेरणा देतात. अधुरी प्रेमकहाणी असलेली पण कर्तव्यपूर्तीनं आपल्याला भारून टाकणारी, आपल्यात एक सामाजिक बदल घडवून आणणारी कादंबरी. सर्वानी अवश्य वाचावी अशी दिनकरची- आजच्या युगातल्या वाल्मिकीची कथा "क्रौंचवध".  


© वृषाली

माझे पुस्तक अनुभव - छावा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडत्या लेखकाच्या , शिवाजी सावंत यांच्या "छावा" या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव. "छावा" या दोन अक्षरातच सर्व सार सामावलंय कादंबरीचं. सिंहाच्या पोटी छावाच जन्म घेतो नि जन्माला आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत तो सिंहच राहतो. संभाजीराजे सुद्धा असेच एक सिंहपुत्र होते. ज्या आदरणीय शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, मराठ्यांचे नाव देशात उज्ज्वल केले, हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, त्या मराठी स्वराज्याच्या मंदिरावर महाराजांच्या या पुत्रानं स्वतःच्या कर्तृत्वाने, बलिदानाने सुवर्ण कळस चढवला. या अशा अतिशय सुंदर कादंबरीचा मला आलेला अनुभव आणि त्यातून मी जे काही शिकले तेच आज मी तुमच्यासमोर मांडतेय. शब्दांमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या समजून घ्याव्यात अशी विनंती करते.
संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे ते पुत्र. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या संभाजीराजांना जीवनाचे धडे परिस्थितीनेच शिकवले. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगांनी ते काहीतरी शिकत गेले, स्वतःला घडवत गेले. परिस्थितीच्या प्रत्येक तडाख्यातून तावून-सुलाखून निघूनच त्यांच्या आयुष्याचा काळ हा सुवर्णकाळ बनून झळाळून उठला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्यावर पुरंदरच्या तहासाठी मुघलांकडे जामीन राहायची वेळ आली, पण तरीही ते डगमगले नाहीत. जसे महादेवास सर्वांच्या कल्याणासाठी विष पचवावे लागले, तसेच हे विष सुद्धा जनतेच्या कल्याणासाठी संभाजीराजांनी हसत हसत पचविले. त्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा, रयतेच्या कल्याणाचा वसा घेतलेल्या मनाचा याहून मोठा पुरावा काय असेल? ज्या वयात आई-बाबांचं प्रेमाचं, सुरक्षिततेचं छत्र सोडून दूर जाण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही त्या वयात संभाजीराजे जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला शत्रूच्या गोटात जामीन म्हणून ठेवायला तयार झाले होते. पित्याच्या एका शब्दाखातर एवढं साहस करणारा पुत्र विरळाच.
ज्या दैवानं त्यांना जन्मजातच लढवय्या वृत्ती, मुत्सद्दी राजकारणी मन दिल होत त्याच दैवानं त्यांना एक कवी मनही बहाल केलं होत. आजूबाजूची परिस्थिती पाहून जसे ते नवीन काहीतरी शिकत होते, तसेच त्यांच्यातला कवीही मोठा होत गेला नि यातूनच निर्मिती झाली बुद्धभूषण या ग्रंथाची. राजकारणावर आधारित असा हा ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहला. याच ग्रंथामध्ये असलेल्या चार ओळी ज्या माझ्या मनाला अतिशय भिडल्या त्या अर्थासह खाली देत आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ - जेव्हा वाईट कालरूपी भुजंग, जनतेला त्रास देण्यासाठी, धर्माचा नाश करण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा सर्व जनतेला त्या वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं एक युगपुरुष अवतरला, त्या महाराजांचा सदैव विजय होत राहूदे.
या ओळींमधूनच आपल्याला समजून येईल कि संभाजीराजांचं आपल्या पित्यावर किती प्रेम होत, त्यांच्याबद्दल किती आदर होता.
हे पुस्तक वाचल्यावर मला संभाजी महाराजांची ओळख अनेक रूपातून झाली. युवराज, एक शूर लढवय्या, कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा वीर, धोरणी राजकारणी, प्रजाहितदक्ष राजा, तरल संवेदना जाणून त्या शब्दबद्ध करणारा कवी, कर्तव्यनिष्ठ पुत्र, प्रेमळ भाऊ नि आदर्श पती. पण या सर्वातही त्यांची खरी ओळख मला पटली ती माणूस म्हणून. मराठा साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर कधी अन्य्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आप्तजणांना विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या, पण निरपराध्यांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी, कोणत्याही कैद्याला कधी त्यांनी सक्तीनं धर्मबदल करायला लावला नाही. औरंगजेबाच्या कुटील-कारस्थानी महासत्तेसमोर त्यांचं हे माणूसपण निश्चितच निविर्वादपणे मोठं वाटलं मला.
संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा खरतर चुकी त्यांच्यापेक्षाही जास्त परिस्थितीची होती. सोयराबाई आणि दरबारातील काही महत्वाचे मंत्रीगण यांनी संभाजीराजांविरुद्ध अशी स्थिती निर्माण केली. इतकंच काय तर शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा कट केल्याचा आरोप हि त्यांच्यावर लावला. सततच्या या कट कारस्थानांमुळे नाईलाजाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना या सर्वांपासून दूर ठेवलं, आपल्या दक्षिण भारतातील स्वारींसोबतही संभाजीराजांना त्यांना नेता आलं नाही. आणि या सर्वातूनच कळत-नकळत संभाजीराजांचं मन दुखावलं गेलं. त्यांनी बंड पुकारलं खर पण हा त्यांचा उठाव शिवाजीमहाराजांविरुद्ध किंवा स्वराज्याविरुद्ध कधीच नव्हता. त्यांचा लढा हा स्वतःविरुद्धच होता. मला तर तो एक युवराज विरुद्ध एक स्वराज्यासाठी लढणारा शूर सेनापती असाच वाटला. केवळ युवराजपणामुळे नव्हे तर एक स्वतंत्र व्यक्ती, या स्वराज्यासाठी झगडणारा एक मावळा म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची ती धडपड त्यांच्या दृष्टीनं योग्यच होती. पण त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग मात्र चुकला.
या मार्गावरून ते परतलेही पण तोपर्यंत बरंच काही घडून गेलं होत. त्यांच्या नावाच्या खऱ्या खोट्या कितीतरी बातम्या एव्हाना मराठी मुलखात पसरल्या होत्या. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गमावलेल सर्वकाही परत मिळवलंही कारण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या त्या छाव्याला औरंगजेबाच्या सामर्थ्याची भीती कधी वाटलीच नाही. पण दोन तुटलेली दोरखंड जोडताना जशी एक गाठ मध्यभागी राहते तशी गाठ राहिली होती. बरेच आप्तस्वकीय, विश्वासू लोक औरंगजेबाच्या भीतीनं म्हणा किंवा त्यांनी दाखवलेल्या आमिषानं म्हणा संभाजीराजांना फितूर झाले.
पुस्तकाचा शेवट वाचताना तर अक्षरशः रडू कोसळते. सिंहासमान आयुष्यभर लढणारा तो वीर फसवला गेला तो स्वकीयांकडून. ज्याला शत्रूच भय कधीच वाटलं नाही त्याला आपल्याच माणसांनी फुटकळ विलोभनांपायी फसवलं. त्या महान राजाची जी विटंबना औरंगजेबाने केली त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. त्यांची विदूषकाचे कपडे घालून मिरवणूक काढली, जीभ कापण्यात आली, डोळे सुद्धा काढले पण इतकं सगळं होऊनही तो छावा औरंगजेबापुढे नमला नाही. खरतर मला संभाजी महाराज विरुद्ध औरंजेब असं युद्ध या पुस्तकातून जाणवलंच नाही. संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोन व्यक्ती नसून प्रवृत्ती असाव्यात इतक्या त्या एकमेकांशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. आणि खरचं त्या दोन प्रवृत्तीच होत्या, तो लढा होता चांगल्या वृत्तीविरुद्ध वाईट वृत्तींचा.
औरंगजेबाचं सैन्य, त्याची सत्ता निश्चितच मोठी होती. पण त्या मागचा इतिहास मात्र काळाकुट्ट होता. औरंगजेब आणि संभाजीराजांना माणुसकीच्या पारड्यात तोलायचं झालं तर निविर्वादपणे महाराजांचं पारडं विजयी ठरलंय पाठोपाठ असंही वाटतंय कशाला करू हि तुलना? कारण स्वतःच्या जन्मदात्याला कैदेत टाकणारा, सख्ख्या भावाला जीवे मारणारा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा औरंगजेब आणि स्वतःच्या पित्याचा एक शब्दही खाली पडू न देणारे, सावत्र आईनं ज्यांच्या मृत्यूचा कट रचला, ज्यांच्या चारित्र्यावर कलंक लावायचा प्रयत्न केला तरीही ज्यांनी तिला माफ केलं, स्वतःच्या सावत्र भावाचा जराही दुस्वास न करता त्याच्यावर निर्भेळ प्रेम करणारे संभाजीराजे यांची तुलना होऊच शकत नाही.
पण तरीही मला हि तुलना कुठंतरी गरजेची वाटली ती यासाठी कि माणूस म्हणून जगताना आपण जरी चुकलो तरी ती चुकी सुधारून सुद्धा आपल्याला आपल्या स्वबळावर जगासाठी प्रेरणास्रोत बनता येत. अनंत कालापर्यंत समाजाच्या मनावर राज्य करता येत. त्यांचे आदर्श होऊन त्यांना मार्ग दाखवता येतो. कारण संभाजीराजांना माहित होत त्यांच्या वाहून गेलेल्या रक्ताच्या एक एक थेंबातुन पुन्हा असे लाखो संभाजी जन्माला येतील जे या मातृभूमीचे सगळ्या वाईट प्रवृतींपासून रक्षण करतील. तो गेला पण जगाला एक कायमची शिकवण देऊन गेला. कितीही खडतर परिस्थिती आली तरी हार न मानता लढायची, कारण चुकतो तो माणूस असतो पण त्याची माणुसकी तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तो या चुकांपासुन काहीतरी शिकतो.
संभाजीराजांची हीच शिकवण मला या पुस्तकातून मिळाली. आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे आपल्याला. कदाचित त्या निर्णयांमुळे तुम्ही चुकाल पण त्यातून सुद्धा काहीतरी शिकाल. आपल्या ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा कारण असं बलिदान कधीच व्यर्थ जात नसत. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला जगण्याची नवीन आशा मिळते नि आपलं बलिदान त्यामुळं कृतार्थ होत. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला मी विनम्र अभिवादन करते, त्यांची शिकवण सदैव आपल्या मनात राहूदे हीच अपेक्षा. जयतु शंभूराजे!!


© वृषाली

Thursday, July 19, 2018

माझे पुस्तक अनुभव - झोंबी

मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा मी माझा एक छानसा पुस्तक अनुभव घेऊन आलीय. अथक प्रयत्नांची, जिद्दीची अशी हि कादंबरी आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे. आज तुम्हाला मी आनंद यादव यांच्या साहित्य क्षेत्रातील मानाचा "साहित्य अकादमी पुरस्कार" मिळालेल्या झोंबी या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव सांगणार आहे. यातून जे काही मला अनुभवाला आलं, मला शिकायला मिळालं ते तुम्हाला उलगडून सांगतेय तुम्हा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते, तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
झोंबी म्हणजे लढा, युद्ध. पुस्तक वाचल्यावर हे शीर्षक पुस्तकाला किती समर्पक आहे हे लक्षात येत, कारण आनंद यादव यांच हे पुस्तक म्हणजे सुद्धा असाच एक लढा आहे. एक विरुद्ध अनेक असा लढा. मग तो लढा त्यांनी अनेक आघाड्यांविरुद्ध लढला, परिस्थिती, जातीव्यवस्था, गरिबी, वशिलेबाजी, तर कधी स्वतःच्या माणसांविरुद्ध.
खरतर माझ्यासारख्या एका शहरी वातावरणात वाढलेल्या मुलीला हे पुस्तक वाचताना सुरवातीला शंकाच वाटली होती. हे पुस्तक मला नीट समजेल का? कारण अनेकांकडून ऐकलं होत या पुस्तकातील भाषा ग्रामीण आहे, कथेचा बाज ग्रामीण आहे, आणि सगळ्यांशी माझा संबंध कधी आलाच नव्हता. पण जस जस पुस्तक वाचत गेले, तसं तसं या पुस्तकाशी एकरूप होत गेले. आणि यातच लेखकाचं सर्व यश सामावलं गेलंय. हे पुस्तक कोणत्याही थरातील वाचकांना आपलंस करत यात शंका नाही. ग्रामीण-शहरी असा भेद हे पुस्तक वाचताना आड येत नाही कि कुठेही ग्रामीण भाषा समजून घेण्याची अडचण जाणवत नाही. अगदी सहजरित्या समजून जात सर्व काही नि तितक्याच प्रकर्षानं जाणवत लेखकाचं संघर्षमय जीवन.
शिक्षणपूर्तीच ध्येय असलेला लहान मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान वयातच प्रौढ बनून अनंत अडचणींना सामोरं जातो आणि याच अक्षरशः जिवंत वर्णन केलय आनंद यादव यांनी. लेखकाच्या बालमनाचं एकच स्वप्न असत शिकून कोणीतरी मोठं माणूस व्हायचं, घरची गरिबी दूर करायची. पण ते शिक्षण सुद्धा त्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही एकलव्यासारखी स्थिती असते छोट्या आनंदची, स्वतःची विद्या त्याला स्वतःलाच मिळवावी लागते, ते हि घरच्या लोकांनी कितीतरी वेळा परिस्थितीची कारण देत मागितलेली गुरुदक्षिणा देऊन.
त्या काळात असलेली बालविवाहाची प्रथा, वर्णव्यवस्था, गरिबी या सर्वांविरुद्ध लेखकानं दिलेला लढा म्हणजे झोंबी. शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच झाले पाहिजे हा नियम असलेली समाजव्यवस्था, गरीब मुलांच्या शिक्षणाची नसलेली सोय, अगदी फ्रीशिप सुद्धा सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीयांना मिळावी अशी वशिल्याची पद्धत, घरची जबादारी, लहान भावंडांचा सांभाळ, शेतीची काम या सगळ्यातून वेळ मिळाला तर शाळा या सर्वांवर मात करून लेखकानं ज्या जिद्दीनं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं त्या सर्वांचं यथासांग वर्णन पुस्तकात केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरीच का झालं पाहिजे? ज्या गरिबांना फ्रीशिपची जास्त गरज आहे ती त्यांना न मिळता आर्थिक सुस्थितीत असणाऱ्यांना का मिळावी ? गरीब मुलांना केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीत, चांगले कपडेलत्ते नाहीत म्हणून शिक्षणाचा अधिकार का नाकारावा? या सारखे असंख्य प्रश्न छोट्या आनंदच्या मनात रोज उभे राहत नि परिस्थितीमुळे हतबल होऊन मिटून जात.
दोन वेळच अन्न मिळायची मुश्किल असताना त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करतात. आपलं जे वय खेळण्या बागडण्याचं असत तिथे आनंद यादव यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, एकीकडे शेती करून दुसरीकडे शिक्षण पूर्ण केले. घरात वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध पाहून त्यांना मधेच एकदोनदा शाळा सोडावी देखील लागली.
नाईलाजास्तव शिक्षण मधेच थांबल्यावर त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांना झालेलं दुःख यामध्येसुद्धा ते खचले नाहीत. तर झालेल्या दुःखावर मात करण्यासाठी जेव्हा ते आजूबाजूच्या लोकांशी, त्यांच्या परिस्थितीशी आणि पर्यायाने सर्व समाजव्यवस्थेशी जवळ आले तेव्हा जन्माला आला त्यांच्यातला कवी, लेखक, विचारवंत. समाजाच्या ज्या स्तरातून आनंद यादव आले होते, जी समाजरचना, जे लोक, जी कार्यप्रणाली त्यांनी पहिली होती त्या समाजव्यवस्थेचे जिवंत चित्र त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं. अगदी आहे तशाच भाषेत म्हणूनच कदाचीत ते आपल्याला जास्त जिवंत वाटत. जनमाणसात त्याच वेगळेपण उठून दिसत.
अथक प्रयत्न करून आनंद यादव यांनी मॅट्रिक पूर्ण केली, नि त्यांच्या याच लढ्याची कथा म्हणजे झोंबी. हा लढा लढताना त्यांना प्रसंगी आपल्याच माणसांशी सुद्धा बंड करावं लागलं. पण त्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होते. अजाणते वयात झालेल्या त्यांच्या आई बाबांचे लग्न, संसारात मुलाबाळांची भर पडत चाललेली, कर्जबाजारी शेतमळा, भावंडांचे मृत्यू, हे सर्व त्यांनी डोळ्यादेखत पाहिलं होत नव्हे तेच आयुष्य ते जगत आले होते. त्यांना ठाऊक होत जर आज आपण शिकून मोठे झालो तर उद्या आपल्या घरची हि परिस्थिती नक्की बदलेल. म्ह्णून सर्व समाजव्यवस्थेच्या जुन्या, बुरसटलेल्या मतांना छेद देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
या पुस्तकाने आपल्याला एक अशी शिकवण दिलीय, जी आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडेल. ती म्हणजे माणसानं नेहमी ध्येयपूर्तीसाठी जगावं, आपल्या स्वप्नांसाठीं झगडावं.ती पूर्ण करण्याचे मनापासून प्रयत्न करावेत. कारण जितका मोठा संघर्ष तितकेच मोठे त्याचे यश. छोट्या आनंदचा लढा होता शिक्षणासाठी तेच त्याच ध्येय होत. आपल्यापुढे सुद्धा असंच कोणतं ना कोणतं ध्येय नक्की असेल शिक्षण, करिअर, आपलं घर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची स्वप्न वेगळी,ध्येय वेगळी पण करावा लागणारा संघर्ष मात्र सारखाच. कधी तो संघर्ष या समाजाविरुद्ध करावा लागेल, कधी परिस्थितीविरुद्ध तर कधी आपल्याच माणसांविरुद्ध देखील. पण जर आपलं ध्येय योग्य असेल तर मागे वळून न पाहता त्या लढ्यात उतरा. आयुष्याच्या त्या झोंबीसाठी सज्ज रहा.
यातूनच आपल्याला आपला उज्ज्वल भविष्यकाल मिळेल. जो इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देईल.
म्हणतात ना,
"मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची" ...........


© वृषाली

Sunday, April 22, 2018

Did I Really Quit?


खरंच का हरलेय मी? खरंच का हरलोय आपणं? एका आठ वर्षाच्या कोवळ्या जीवाचा असा अंत पाहिल्यावर वाटत, या देशात सर्व काही हरलंय. माणुसकी हरली, सर्वधर्म समभाव हरला, विसरलो आपणं ती देशाप्रती असणारी प्रतिज्ञा, हरलो आपणं आपला भारतीय असल्याचा स्वाभिमान.
आठ वर्षांची आसिफा, नुसती जिवंत असतानाच बलात्कार होऊन नाही मेली, तर मेल्यावरही तिचा बलात्कार होत राहिला. एक जण म्हणाला "अच्छा हुआ आसिफा मर गयी, बड़ी होती तो वैसेभी आतंकवादी बनती." हा अत्याचार झाला तिच्यावर, कुणी तिच्या गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं हा एक अत्याचार, एकाने तर वरकडीच केली, म्हणे "तरुणांकडून अशा चुका होतंच राहतात." परत परत अत्याचार होत राहिले तिच्यावर. अरे त्या मेलेल्या जीवाला तरी शांती लाभू द्या ना! कदाचित ती सुद्धा वरून म्हणत असेल, मेलेय मी आता, थांबवा माझ्यावर होणारे हे रोजचे बलात्कार. माणुसकी नसलेले पशु झालाय हा समाज. तिच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, भलती- सलती विधाने करणारे आपले नेते, जेव्हा त्यांच्या मुली-बहिणीवर असे अत्याचार होतील तेव्हा गप्प बसतील का? तेव्हा त्यांच्यातला माणूस जागा होईल. पण आता का त्यांच्यातली माणुसकी झोपलीय कारण ती तुमची कोणी नाही म्हणून?
अरे नसेल तिचा आणि आपला धर्म एक, पण माणुसकी तर सर्वांसाठी एकच असते ना? आणि आपल्या सर्वाना बांधून ठेवणारा सगळ्यात मोठा धर्म आहे आपण "भारतीय" आहोत तो. हिंदू-मुस्लिम, शीख-ख्रिश्चन, यांच्यापेक्षा हा धर्म कितीतरी मोठा आहे. बाजार मांडला गेलाय तिच्या भावनांचा. तिच्या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल हे पाहण्यापेक्षा काही काही नेते आपली विधान मांडण्यात आणि त्यांचं समर्थन करण्यात गुंतलेत. आपण भलेही आज तिच्यासाठी Candle Light मोर्चे काढतो. #justiceForAsifa लिहतो. Tweets करतो, Facebook वर Comments पण करतो. पण यापेक्षाही जास्त तिला गरज आहे ती न्यायाची. आणि त्यासाठी योग्य ते कायदे बदलले गेले पाहिजेत. सगळ्याच बाबतीत दया-क्षमा-शांती, हे धोरण योग्य नाही ठरत. जिथे गरज पडते तिथे जशास तसे उत्तर पण द्यावे लागते. जसे कायदे आज सौदी अरेबिया मध्ये आहेत ना बलात्काऱ्यांबाबतीत तसेच इथे पण लागू केले पाहिजेत. भर चौकात, सगळ्यांसमोर फाशी द्या अशा लोकांना. पुन्हा असली कृत्य करताना दहा वेळा विचार केला पाहिजे त्यांनी. जसा एका मुलीचा बलात्कार होतो तसेच या लोकांचे पण चार चौघात धिंडवडे निघाले पाहिजेत. खरंच असा कायदा यायला हवा आपल्या देशात.
दुःख मला पण झालं आसिफा तुझ्यासाठी, अश्रू मी हि गाळले. भलेही आपली जात-धर्म एक नसेल पण आहोत तर भारतमातेच्याच मुली ना आपण. स्वप्नात तुझ्या किंचाळ्या-रडणं सगळं काही येऊन गेलं नि मनाचा थरकाप उडाला अगदी. माझ्या चिमुकल्या बहिणीवर इतके अत्याचार करू तरी कसे वाटले त्या हैवानांना? हो हैवानच म्हणावे लागेल त्यांना. पूर्वीच्या काळी लोकांना त्रास द्यायला वाईट शक्ती जशा असुरांचे, दानवांचे रूप घेऊन यायच्या तसे हे आजच्या युगातील दानव आहेत. कधी कधी भीती सुद्धा वाटते हाच का तो भारत देश जिथे परस्त्री मातेसमान मानली जाते? मग या चिमुकलीची दया का नाही आली त्यांच्यापैकी कुणालाच? आताशी भीती वाटते एकटी बाहेर पडायला, न जाणो कधी कुणाच्या वासनेला बळी पडू आम्ही मुली.
खूप सारे प्रश्न आहेत ग पण कुठेतरी विश्वास पण आहे, कि हे चित्र बदलेल, आम्ही बदलू, कुठूनतरी सुरवात करायचीच आहे ना मग आम्ही आमच्यापासूनच करू ती सुरवात. या देशाची तरुण पिढी करेल ते. आज सर्व देश एकत्र आलाय तुला न्याय मिळवून देण्यासाठी. तेव्हा नक्की वाटत या लोकांचे Candle Light मोर्चे, #justiceForAsifa. Tweets, Facebook Comments वाया नाही जाणार. प्रत्येकाचे तुला न्याय मिळवून देण्याचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश्य एकचं आहे. जेव्हा आम्ही तुझ्या न्यायासाठी एकत्र आलो ना तेव्हा किती हिंदू आलेत, किती मुस्लिम आलेत, किती ख्रिश्चन आलेत हे नाही मोजलं कोणी, त्याची गरजच पडली नाही. कारण तेव्हा माणुसकी एकत्र आली होती. अजूनही मेलेली नाही आहेत हि मन.
माझ्यासारखी एक मुलगी आज जर हा विचार करतेय कि माझ्या पासून दूरच्या राज्यात राहत असलेल्या माझ्या एका बहिणीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी तर असले विचार तुला आज अनेकजणांमध्ये सापडतील. आहोत तर शेवटी आपण भारतमातेची मुलं ना?
जेव्हा जेव्हा इथे अत्याचार झालाय, तेव्हा या अत्याचाराला थांबवण्यासाठी कोणी ना कोणी शक्ती जन्माला आलीय. कधी ती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तलवारीनं अन्यायाची चिरफाड करायला आली, तर कधी भगतसिंग-आझादांचे रूप घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला आली. राक्षसांचा अत्याचार वाढल्यावर प्रत्यक्ष देवी सुद्धा जिथं कालीच रूप घेऊन राक्षसांचा नायनाट करायला प्रकटते, तिथे तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार आम्ही.
तुला न्याय मिळेल नक्की मिळेल. जेव्हा त्या नराधमांना शिक्षा होईल तेव्हा तुझा समाधानी चेहरा नजरेसमोर येईल, जो पाहून आमच्या जीवाची घालमेल नक्की थांबेल, कारण तेव्हा माझ्या या बहिणीला न्याय मिळालेला असेल.

© वृषाली